Bellasis bridge Mumbai: 130 वर्षांचा ब्रिटिशकालीन बेलासिस पूल नव्याने उभारला; जानेवारी अखेरीस नागरिकांसाठी खुला
मुंबई : ताडदेव नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा ब्रिटिशकालीन 130 वर्षे जुना बेलासिस पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. अवघ्या 15 महिने 6 दिवसांत उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. जानेवारीच्या अखेरीसहा उड्डाणपुल नागरिकांसाठी खुला होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. सप्टेंबर 2024 मध्ये बांधकामाचा कार्यादेश देण्यात आला होता.
पुलाचे काम सुरू असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात बेस्ट वाहिन्यांचे स्थलांतरण, पूल बांधकामास अडथळा ठरणारी 13 बांधकामे हटवून पर्यायी घरांचे वाटप करणे, पुलानजीकच्या एका गृहनिर्माण संस्थेची बाधित होणारी सीमाभिंत हटविणे, उच्च न्यायालयासमोरील खटला आदींचा समावेश होता. त्यावर मात करत प्रकल्प कामकाजास कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता महापालिकेच्या सर्व अभियंत्यांनी घेतली. सर्व कामाची आखणी नियोजनबद्ध केल्याने पावसाळ्याच्या 4 महिन्यांच्या कालावधीत देखील काम अविरत सुरू होते. त्यामुळे बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्यात यश मिळाले आहे.
कोंडी कमी होणार
दक्षिण मुंबईतील जहांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचे बेलासिस रोड) बेलासिस पूल हा मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षापासून बाधित झालेली पूर्व - पश्चिम वाहतुकीसाठीची सुविधा पुन्हा प्रस्थापित होणार आहे.
हा पूल सेवेत दाखल झाल्यानंतर जहांगीर बोमन बेहराम मार्ग (पूर्वीचे बेलासिस रोड), दादासाहेब भडकमकर मार्गावरील (ग्रॅन्ट रोड), विशेषतः पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

