Gen Z Spending Habits: Gen Zचा पगार नेमका कुठे खर्च होतो? बिल, किराणा की ऑनलाइन शॉपिंग? नव्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

भारतामधील Gen Z तरुणांच्या खर्चाबाबत झालेल्या नव्या अभ्यासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Gen Z Spending Habits
Gen Z Spending HabitsPudhari
Published on: 
Updated on: 

सोशल मीडियावर Gen Z म्हणजेच तरुण पिढीची जीवनशैली पाहिली की, त्यांचा बहुतांश पैसा कॅफे, ऑनलाइन शॉपिंग, फिरणे आणि महागड्या गॅजेट्सवर खर्च होत असावा, असे वाटते. मात्र, एका नव्या अभ्यासातून वेगळेच चित्र समोर आले आहे. भारतातील तरुण नोकरदारांचा सर्वाधिक पैसा शॉपिंगवर नव्हे, तर दैनंदिन गरजांवर खर्च होत असल्याचे दिसून आले आहे.

वीज आणि पाण्याची बिले, मोबाईल रिचार्ज, ओटीटीचे सबस्क्रिप्शन, किराणा सामान आणि इतर आवश्यक गोष्टींवर तरुणांच्या पगारातील मोठा हिस्सा खर्च होत आहे. त्यामुळे Gen Z ही पिढी केवळ उधळपट्टी करते, असा समज या अभ्यासामुळे काही प्रमाणात बदलताना दिसत आहे.

Gen Z च्या खर्चाचा हिशोब काय सांगतो?

एका अभ्यासात 5.2 लाखांहून अधिक नोकरदार Gen Z तरुणांच्या यूपीआय व्यवहारांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये 18 ते 29 वयोगटातील तरुणांचा समावेश होता. त्यांच्या लाखो यूपीआय व्यवहारांच्या आधारे महिन्याचा खर्च कोणत्या गोष्टींवर होतो, याची माहिती गोळा करण्यात आली.

या अभ्यासानुसार, तरुणांच्या मासिक खर्चात सर्वाधिक वाटा बिले आणि विविध सबस्क्रिप्शनचा आहे. त्यानंतर किराणा सामान, आर्थिक सेवा, शॉपिंग आणि खाण्यापिण्यावर खर्च केला जातो. विशेष म्हणजे, या पाच प्रमुख गोष्टींवरच तरुणांच्या एकूण मासिक खर्चातील 70 टक्क्यांहून अधिक रक्कम खर्च होते.

Gen Z चा पैसा नेमका कुठे खर्च होतो?

अभ्यासातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, तरुणांच्या एकूण खर्चाचे चित्र पुढीलप्रमाणे आहे.

  • बिल आणि सबस्क्रिप्शन: 20.1 टक्के

  • किराणा खरेदी: 15.7 टक्के

  • आर्थिक सेवा: 12.2 टक्के

  • शॉपिंग: 11.9 टक्के

  • खाणे-पिणे: 11.5 टक्के

  • प्रवास: 5 टक्के

या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते. तरुणांच्या खर्चात बिले आणि दैनंदिन गरजांना सर्वाधिक प्राधान्य आहे. सोशल मीडियावर दिसणारी महागडी जीवनशैली आणि प्रत्यक्षातील खर्च यामध्ये मोठी तफावत असल्याचेही यातून दिसते.

Gen Z Spending Habits
Cyber Fraud Gold Purchase: सायबर चोरट्यांचा सराफांना फटका! यूपीआयद्वारे सोने खरेदी करून लुबाडलेली रक्कम लपविण्याचा नवा फंडा

सबस्क्रिप्शनवर सर्वाधिक पैसा का खर्च होतो?

आजच्या तरुणांचे आयुष्य मोठ्या प्रमाणात डिजिटल झाले आहे. मोबाईल रिचार्ज, इंटरनेट, ब्रॉडबँड, वीजबिल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन हे महिन्याचे ठरलेले खर्च झाले आहेत.

अनेक तरुण यूपीआय ऑटो पेचा वापर करतात. त्यामुळे मोबाईल रिचार्ज किंवा विविध सबस्क्रिप्शनचे पैसे ठरलेल्या दिवशी आपोआप खात्यातून कट होतात.

मनोरंजनासाठीही तरुण वेगवेगळ्या ओटीटी आणि म्युझिक प्लॅटफॉर्मचा वापर करतात. अभ्यासानुसार, मनोरंजनाशी संबंधित सबस्क्रिप्शनमध्ये जिओ हॉटस्टारचा वाटा सर्वाधिक 12.4 टक्के आहे. त्यानंतर नेटफ्लिक्सचा 10.7 टक्के आणि स्पॉटिफायचा 5.6 टक्के वाटा आहे. यावरून तरुणांच्या दैनंदिन जीवनात डिजिटल सेवांचे महत्त्व किती वाढले आहे, हे लक्षात येते.

Gen Z Spending Habits
Sonia Gandhi Autobiography: 'ते माझ्याशी नजर मिळवणंही टाळतात...', सोनिया गांधींचा पुस्तकातून मोठा खुलासा! PM मोदींबद्दल काय लिहिलंय?

वयानुसार तरुणांच्या खर्चातही बदल

या अभ्यासात 18 ते 23 वर्षे आणि 24 ते 29 वर्षे अशा दोन वयोगटांतील तरुणांच्या खर्चाची तुलना करण्यात आली. त्यातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे.

18 ते 23 वर्षे वयोगटातील तरुणांच्या एकूण खर्चापैकी 50 टक्के रक्कम आवश्यक गोष्टींवर खर्च होते. तर 24 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये हे प्रमाण वाढून जवळपास 59 टक्क्यांवर पोहोचते.

याचा अर्थ वय वाढत जाते, तशा जबाबदाऱ्याही वाढतात. नोकरीतील अनुभव आणि आर्थिक जबाबदाऱ्या वाढल्यानंतर घरखर्च, बिले आणि इतर गरजांवर अधिक पैसे खर्च होऊ लागतात.

अर्थात, याचा अर्थ तरुणांनी आपल्या आवडी-निवडींवर खर्च करणे बंद केले आहे, असा नाही. मात्र, गरजा आणि हौसमौज यांच्यात योग्य समतोल साधण्याकडे त्यांचा कल वाढत असल्याचे दिसते.

ट्रॅव्हलची चर्चा जास्त, पण खर्च फक्त 5 टक्के

Gen Z म्हटलं की फिरणे, नवीन ठिकाणं पाहणे आणि वेगवेगळ्या पर्यटनस्थळांवर जाणे, असे चित्र डोळ्यांसमोर येते. सोशल मीडियावरही तरुणांच्या ट्रॅव्हल आणि व्हेकेशनचे फोटो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र, अभ्यासातील आकडेवारी वेगळीच सांगते. तरुणांच्या एकूण खर्चापैकी प्रवासावर होणारा खर्च केवळ 5 टक्के आहे.

यावरून सोशल मीडियावर दिसणारी जीवनशैली आणि तरुणांच्या प्रत्यक्ष आर्थिक व्यवहारांमध्ये फरक असल्याचे स्पष्ट होते. एकीकडे तरुणांना फिरण्याची आणि नवीन अनुभव घेण्याची आवड आहे, तर दुसरीकडे दैनंदिन गरजा आणि आर्थिक जबाबदाऱ्या यांनाही ते तितकेच महत्त्व देत आहेत.

Gen Z पिढीबद्दल असलेला समज या अभ्यासातून काही प्रमाणात बदलताना दिसतो. तरुणांचा पगार केवळ शॉपिंग, महागडे गॅजेट्स आणि फिरण्यावर खर्च होत नाही. तर त्यातील मोठा हिस्सा रोजच्या गरजा भागवण्यासाठी जात आहे. सोशल मीडियावर दिसणाऱ्या चमकदार जीवनशैलीपेक्षा तरुणांच्या प्रत्यक्ष खर्चाचे चित्र वेगळे असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.