Cyber Fraud Gold Purchase: सायबर चोरट्यांचा सराफांना फटका! यूपीआयद्वारे सोने खरेदी करून लुबाडलेली रक्कम लपविण्याचा नवा फंडा

तळेगाव दाभाडेतील सराफी दुकानात ३.३९ लाखांचे सोन्याचे बार खरेदी; सायबर गुन्ह्यांतील पैशांमुळे बँक खाते गोठण्याचा धोका
Gold Cyber Fraud
Gold Cyber FraudPudhari
Published on: 
Updated on: 

संतोष शिंदे

पिंपरी: ऑनलाइन फसवणुकीतून लुबाडलेल्या पैशांचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी सायबर चोरट्यांनी आता सराफ व्यावसायिकांना लक्ष्य केले आहे. ग्राहक बनून सराफी दुकानात जायचे, यूपीआयद्वारे पैसे भरून सोन्याची बिस्किटे खरेदी करायची आणि पोबारा करायचा, असा नवा फंडा समोर आला आहे. विशेष म्हणजे, सराफाच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा होत असल्याने व्यवहाराबाबत संशय येत नाही. मात्र, पुढे सायबर गुन्ह्याच्या तपासात या रकमेचा संबंध आढळल्याने बँक खाते गोठण्याचा धोका निर्माण होत आहे. सणासुदीच्या काळात सराफा दुकानांमधील वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Gold Cyber Fraud
Nashik Phata Road Potholes: नाशिक फाटा चौकात खड्ड्यांची ‘मलमपट्टी’! सिमेंटचे गट्टू टाकल्याने वाहतूक मंदावली, अपघाताचा धोका

तळेगाव दाभाडे येथील एका सराफी दुकानात घडलेल्या प्रकारामुळे ही कार्यपद्धती समोर आली आहे. संबंधित व्यावसायिकाने दिलेल्या तक्रार अर्जानुसार, एक तरुण ग्राहक बनून दुकानात आला. त्याने सोन्याचे बार खरेदी करून सहा यूपीआय व्यवहारांद्वारे तीन लाख ३९ हजार १२८ रुपये दुकानाच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर तो सोने घेऊन निघून गेला. मात्र, पुढे यातील काही व्यवहारांबाबत राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रारी असल्याचे समोर आले. संबंधित तरुणाचे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध असून, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकाने अर्जात केली आहे.

Gold Cyber Fraud
Bhaubeej Digital Payment: भाऊबीजेच्या ओवाळणीला डिजिटल टच! पाकिटातील पैशांची जागा आता यूपीआय पेमेंटने घेतली

म्हणून चोरट्यांची सोन्याला पसंती

डिजिटल अटक, शेअर ट्रेडिंग, ऑनलाइन गुंतवणूक आणि विविध आमिषांतून नागरिकांना गंडा घालणारे सायबर गुन्हेगार लुबाडलेली रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांत फिरवून तिचा मूळ स्रोत लपविण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने या पैशांचे मौल्यवान धातूत रूपांतर केले जाऊ शकते. सोन्याला देशभर मागणी असल्याने त्याची अन्य ठिकाणी विक्री करून रोख रक्कम मिळविणे तुलनेने सोपे असते. शिवाय, सोने वितळवून त्याचे स्वरूप बदलल्यास मूळ खरेदीतील वस्तूची ओळख पटविणे कठीण होऊ शकते. त्यामुळे गुन्ह्यातील संपत्ती लपविण्यासाठी सोन्याचा वापर करण्याची पद्धत चोरट्यांनी अवलंबली आहे.

खाते गोठल्यास काय कराल?

सायबर गुन्ह्याच्या तपासात बँक खात्यावर निर्बंध आल्यास संबंधित व्यावसायिकाने सर्वप्रथम बँकेकडून कारवाईचे कारण, तक्रार क्रमांक आणि तपास यंत्रणेची माहिती मिळवावी. त्यानंतर संबंधित व्यवहाराचे बिल, बँक स्टेटमेंट, यूपीआय क्रमांक आणि ग्राहकाच्या खरेदीचे पुरावे तपास अधिकाऱ्यांकडे सादर करावेत. खात्यातील ठरावीक रकमेवर होल्ड आहे की संपूर्ण खाते गोठविण्यात आले आहे, याची खात्री करावी. आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला घेऊन निर्बंध उठविण्यासाठी पोलिसांकडे दाद मागता येऊ शकते. व्यवहाराच्या नोंदी व्यवस्थित असल्यास तपासात आपली बाजू स्पष्ट करण्यास मदत होते.

Gold Cyber Fraud
Indrayani River Debris: इंद्रायणी नदीपात्रातील राडारोडा हटविण्यास ठेकेदाराची टाळाटाळ; देहू नगरपंचायतीची नोटीस कागदावरच?

सोने गेले, भांडवलही अडकले !

दिवाळी आणि लग्नसराईमुळे सराफी दुकानांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असते. अशा काळात एखाद्या व्यवहारातील रकमेवर निर्बंध आल्यास त्याचा थेट परिणाम व्यावसायिकाच्या खेळत्या भांडवलावर होऊ शकतो. सायबर गुन्ह्याच्या तपासात पोलिसांकडून पैशांचा माग काढताना संबंधित खात्यापर्यंत रक्कम पोहोचल्याचे निष्पन्न झाल्यास त्या रकमेवर होल्ड लागू शकतो. काही प्रकरणांत कायदेशीर प्रक्रियेनुसार संपूर्ण खात्यावरही निर्बंध येऊ शकतात. परिणामी, पुरवठादारांची देणी, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि नवीन मालाची खरेदी अडचणीत येण्याची शक्यता असते. त्यातच विकलेले सोने परत मिळविण्यासाठी कायदेशीर अडचण येते.

अति घाई... संकटात नेई..!

बनावट यूपीआय स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक करण्याच्या प्रकारांपेक्षा ही पद्धत अधिक गुंतागुंतीची आहे. कारण, बँकेत जमा झालेल्या रकमेचा पूर्वीच्या सायबर गुन्ह्याशी संबंध आहे का, हे व्यवहाराच्या क्षणी सामान्य व्यापाऱ्याला समजण्याची खात्रीशीर यंत्रणा उपलब्ध नाही. विशेषतः अनोळखी ग्राहकाने मोठ्या प्रमाणात सोन्याचे बार मागविणे, एकाच बिलासाठी अनेक खात्यांतून पैसे भरणे, खरेदीदाराऐवजी अन्य व्यक्तीने पेमेंट करणे किंवा बिलिंगची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी दबाव आणणे, ही संशयाची कारणे आहेत. गर्दीच्यावेळी अशा बाबीकडे दुर्लक्ष होण्याची जास्त शक्यता आहे.

Gold Cyber Fraud
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरीत टोमॅटो १५ रुपये किलो; लसूण २५० रुपयांवर, कांदा आणि लिंबाचे दरही तेजीत

सराफ संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज

सायबर गुन्ह्यांच्या बदलत्या कार्यपद्धती लक्षात घेता सराफ संघटनांनी सदस्यांसाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे. दुकानातील कर्मचारी, व्यवस्थापक आणि बिलिंग काउंटरवरील व्यक्तींना संशयास्पद ग्राहक ओळखण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहेत. तसेच, पोलिस आणि बँक अधिकाऱ्यांच्या सहभागातून कार्यशाळा घेऊन डिजिटल व्यवहारांतील धोके समजावून सांगणे गरजेचे आहे.

सराफांनी अशी घ्यावी खबरदारी

  • मोठ्या रकमेच्या खरेदीत ग्राहकाची ओळख आणि आवश्यक कागदपत्रांची नियमानुसार पडताळणी करावी.

  • पैसे भरणारी व्यक्ती वेगळी असल्यास तिच्याशी असलेला संबंध स्पष्ट करून घ्यावा.

  • यूपीआय व्यवहाराचा स्क्रीनशॉट ग्राह्य न धरता बँकेच्या अधिकृत सुविधेतून रक्कम जमा झाल्याची खात्री करावी.

  • प्रत्येक व्यवहाराचे बिल, पेमेंटचा संदर्भ क्रमांक, ग्राहकाची उपलब्ध माहिती आणि सीसीटीव्ही चित्रीकरण सुरक्षित ठेवावे.

  • संशयास्पद व्यवहारात घाईने सोने सुपूर्त करू नये.

  • गैरप्रकार निदर्शनास आल्यास संबंधित बँक आणि सायबर पोलिसांना तातडीने कळवावे.

सायबर गुन्ह्यांतील रकमेचा वापर सोने खरेदीसाठी केला जात असल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सराफ व्यावसायिकांनी डिजिटल व्यवहारांमध्ये विशेष खबरदारी घ्यावी. मोठ्या रकमेच्या खरेदीत ग्राहकाची ओळख आणि पेमेंट करणाऱ्या व्यक्तीची पडताळणी करणे आवश्यक आहे. संशयास्पद व्यवहारांची माहिती तत्काळ पोलिसांना दिल्यास पुढील आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते.

रविकिरण नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.