

Vaibhav Suryavanshi Income Tax: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी. अवघ्या 15 वर्षांच्या या युवा क्रिकेटपटूने आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. मोठमोठ्या गोलंदाजांवर षटकारांचा वर्षाव करत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. मैदानावरील या यशानंतर त्याच्यावर बक्षिसांचा आणि जाहिरातींचा वर्षावही सुरू झाला आहे.
आयपीएल करार, मॅच फी, पुरस्कार आणि ब्रँड एंडोर्समेंट्सच्या जोरावर वैभवची अंदाजे संपत्ती आता 7 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याचे सांगितले जात आहे. मात्र यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न चर्चेत आला आहे. एवढ्या कमी वयात कोट्यवधींची कमाई करणाऱ्या वैभवला आयकर भरावा लागेल का?
भारतातील आयकर कायद्यानुसार अल्पवयीन मुलांच्या उत्पन्नासाठी वेगळे नियम आहेत. सामान्यतः एखाद्या अल्पवयीन मुलाच्या नावावर असलेल्या बँक ठेवीवरील व्याज, एफडी किंवा पालकांनी केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न हे त्या मुलाच्या नावावर न मोजता पालकांच्या उत्पन्नात जोडले जाते.
याला ‘क्लबिंग ऑफ इनकम’ असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत ज्या पालकाचे उत्पन्न जास्त असेल, त्यांना त्या उत्पन्नावर कर भरावा लागतो.
मात्र आयकर कायद्यात याला एक महत्त्वाचा अपवाद आहे. जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीने स्वतःच्या कौशल्य, प्रतिभा, मेहनत किंवा विशेष ज्ञानाच्या आधारे उत्पन्न कमावले असेल, तर ते उत्पन्न पालकांच्या खात्यात जोडले जात नाही.
वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत हाच नियम लागू होतो. त्याची कमाई क्रिकेटमधील कामगिरी, आयपीएल करार, जाहिराती आणि पुरस्कारांमधून होत आहे. त्यामुळे हे उत्पन्न त्याच्या वैयक्तिक कमाईत गणले जाईल.
तज्ज्ञांच्या मते, क्रिकेट किंवा जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न हे ‘बिझनेस किंवा प्रोफेशनमधील उत्पन्न’ या वर्गात दाखवले जाते. त्यामुळे वैभववरही सामान्य करदात्यांप्रमाणेच आयकराचे नियम लागू होतील.
जर त्याची एकूण करपात्र कमाई अंदाजे 7 कोटी रुपये असेल, तर लागू असलेल्या कर स्लॅबनुसार त्याला 30 टक्क्यांपर्यंत कर (2 कोटी 73 लाख) भरावा लागू शकतो असा अंदाज आहे. याशिवाय लागू असलेले अधिभार (Surcharge) आणि सेस (Cess) देखील द्यावा लागू शकतो.
वैभव अद्याप अल्पवयीन असल्याने तो स्वतः करारांवर स्वाक्षरी करू शकत नाही किंवा आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करू शकत नाही. त्यामुळे त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक ‘Representative Assessee’ म्हणून त्याच्या वतीने आयकर रिटर्न भरतील.
अवघ्या 15 व्या वर्षी कोट्यवधींची कमाई करणारा वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेटमधील नव्या पिढीचा चेहरा बनला आहे. मात्र मोठ्या कमाईसोबत कर भरण्याची जबाबदारीही येते. त्यामुळे क्रिकेट मैदानावर जशी त्याची फलंदाजी चर्चेत आहे, तशीच आता त्याच्या कमाई आणि कर व्यवस्थापनाची चर्चाही सुरू झाली आहे.