

Trump Tariff Indian Rice Trade Tensions: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर व्यापार निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकन शेतकऱ्यांसाठी 12 अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजची घोषणा करताना त्यांनी भारताच्या तांदळावर आणि कॅनडातून येणाऱ्या खतांवर नवीन टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे.
ट्रम्प यांनी असा आरोप केला आहे की भारत, व्हिएतनाम आणि थायलंड हे देश अमेरिकन बाजारात स्वस्त तांदूळ ‘डंप’ करतात, ज्यामुळे अमेरिकन तांदूळ उत्पादकांचे नुकसान होते. त्यांनी इशारा दिला की, “हे आम्ही होऊ देणार नाही. यावर कठोर पावले उचलू.”
अमेरिकन शेतकऱ्यांचा दावा आहे की परदेशातून येणारा स्वस्त तांदूळ त्यांच्या उत्पादनाच्या किमती खाली आणतो आणि स्थानिक बाजार अस्थिर करतो. ट्रम्प यांनी हे आरोप मान्य केले आणि अतिरिक्त टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ट्रम्प प्रशासनाने भारतातून येणाऱ्या विविध वस्तूंवर 50% पर्यंत टॅरिफ वाढवले आहेत.
तांदळानंतर आता कॅनडाहून येणारी खतेही ट्रम्प यांच्या निशाण्यावर आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, “अमेरिकेत वापरली जाणारी मोठ्या प्रमाणातील खते कॅनडातून येतात. गरज पडली तर त्यावरही टॅरिफ लावू. यामुळे देशांतर्गत उत्पादनही वाढेल.”
भारत–अमेरिका व्यापार चर्चा गेली काही महिने सुरू असली तरी कोणताही निर्णय झालेला नाही. या आठवड्यात अमेरिकेचे प्रतिनिधीमंडळ भारतात येणार आहे, या चर्चेत तोडगा निघण्याची शक्यता आहे. कॅनडासोबतही व्यापार करारावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी याआधीही कॅनडाला अनेक उत्पादनांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती.
महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि आयात वाढल्याने अमेरिकन शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी 12 अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर केले आहे. शेतकरी वर्ग हा ट्रम्प यांचा मतदार आहे, त्यामुळे त्यांना खुश ठेवणे हे त्यांचे राजकीय उद्दिष्ट असल्याचे दिसून येत आहे.