Stock Market | सेन्सेक्स ३७५ अंकांनी घसरून बंद, जाणून घ्या बाजारातील घसरणीची ४ प्रमुख कारणे
Stock Market Updates
भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराबद्दलची अनिश्चितता, कच्च्चा तेलाच्या दरातील वाढ, विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा सुरु केलेली विक्री आणि जागतिक कमकुवत संकेतांमुळे गुरुवारी (दि. १७ जुलै) भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३७५ अंकांनी घसरून ८२,२५९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १०० अंकांनी घसरून २५,१११ पर्यंत खाली आला.
आजच्या सत्रात मुख्यत: आयटी आणि फायनान्सियल शेअर्सवर दबाव राहिला. निफ्टी आयटी १.४ टक्के घसरला. तर निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस निर्देशाक ०.४ टक्के घसरला.
बीएसई सेन्सेक्सवर टेक महिंद्राचा शेअर्स २.७ टक्के घसरला. त्याचबरोबर इन्फोसिस १.६ टक्के, एचसीएल टेक १.२ टक्के घसरला. इर्टनल, एलटी, टीसीएस, मारुती, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स हे शेअर्सही घसरले. तर दुसरीकडे टाटा स्टील, ट्रेंट, टायटन, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वाढून बंद झाले.
ही आहेत बाजारातील घसरणीचे प्रमुख कारणे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांना हटवण्याचा विचार करत असल्याच्या वृत्तांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्या आहेत.
त्यात आयटी कंपन्यांच्या जून तिमाहीतील कमाईचे आकडे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावण्यास अपयशी ठरले आहेत.
विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात पुन्हा विक्री सुरु केली आहे. त्यांनी बुधवारी एका दिवसात १,८५८ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. याचाही बाजारात दबाव राहिला.
कच्च्चा तेलाच्या दरात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर ०.५ टक्के वाढून प्रति बॅरल ६८.९२ डॉलरवर गेला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे भारताला तेल आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. यामुळे महागाई वाढण्याची धोका असतो, असे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.

