

आयकर भरण्याची वेळ जवळ आली की, अनेकदा टीडीएस (TDS) आणि टीसीएस (TCS) हे शब्द कानावर पडतात. पगार, व्याज किंवा कमिशन घेताना काही रक्कम कापली जाते, तर काही वस्तू खरेदी करताना बिलावर अतिरिक्त कर आकारला जातो. या दोन्ही प्रक्रिया जरी कर गोळा करण्याच्या असल्या, तरी त्यांच्यात मोठा फरक आहे. हा फरक समजून घेणे, प्रत्येक करदात्यासाठी आवश्यक आहे.
कर चोरी रोखणे - उत्पन्न मिळण्याच्या वेळीच कर वसूल करून सरकारला कर चोरी रोखता येते.
नियमित कर महसूल - सरकारला नियमितपणे महसूल मिळतो, जो देशाच्या विकासासाठी वापरता येतो.
सुलभतेने कर संकलन - थेट कर वसुली ऐवजी देयकाच्या वेळीच कर कपात करणे सोपे ठरते.
कर भरणा सुलभ करणे - प्राप्तकर्त्याला कर एकरकमी भरण्याची गरज नसते. कारण, काही भाग आधीच कपात केलेला असतो.
वस्तूंच्या विक्रीवरील कर वसुली सुनिश्चित करणे - विशिष्ट वस्तू किंवा सेवा विकताना विक्रेत्याने थेट ग्राहकाकडून कर गोळा करावा.
व्यवहाराचे ट्रॅकिंग - मोठ्या व्यवहारांची माहिती कर विभागाकडे पोहोचते.
कराचे शिस्तबद्ध व्यवस्थापन - विक्रेते आणि खरेदीदार या दोघांनी कर नियमांचे पालन करावे, यासाठी एक नियंत्रण यंत्रणा तयार होते.
हे दोन्ही कर प्रणालीचे भाग असून, उत्पन्न व व्यवहार पारदर्शक ठेवण्याच्या द़ृष्टीने महत्त्वाचे आहेत.
टीडीएस म्हणजेच ‘उद्गम कर कपात’. नावाप्रमाणेच, जिथे उत्पन्न निर्माण होते, तिथेच कराची कपात केली जाते. ही एक अशी प्रणाली आहे जिथे पैसे देणारी व्यक्ती किंवा संस्था (उदा. कंपनी / भागीदारी फर्म / संस्था) पैसे घेणार्या व्यक्तीला (उदा. कर्मचारी) रक्कम देण्यापूर्वीच त्यातून कराचा काही भाग कापून घेते आणि तो थेट सरकारच्या तिजोरीत जमा करते.
कोणावर लागू? : पगार, बँकेतील व्याजावरील उत्पन्न, कमिशन, घराचे भाडे, कंत्राटदारांचे शुल्क, व्यावसायिक फी, लॉटरीतील बक्षीस अशा अनेक प्रकारच्या उत्पन्नावर टीडीएस कापला जातो.
जबाबदारी कोणाची? : जो पैसे देतो (Deductor), त्याची जबाबदारी असते की त्याने योग्य दराने कर कापून सरकारकडे जमा करावा.
उदाहरण : जर तुमची कंपनी तुम्हाला महिन्याला 80,000 पगार देत असेल आणि त्यावर टीडीएस लागू होत असेल, तर कंपनी पगारातून अंदाजे कराची रक्कम कापून (उदा. 5,000) तुम्हाला 75,000 देईल आणि कापलेले 5,000 तुमच्या वतीने सरकारकडे जमा करेल.
टीसीएस, म्हणजेच ‘उद्गम कर संकलन’. ही प्रणाली टीडीएसच्या उलट काम करते. येथे विक्रेता (Seller) विशिष्ट वस्तू किंवा सेवा विकताना खरेदीदाराकडून (Buyer) वस्तूच्या किमतीव्यतिरिक्तकराची रक्कम गोळा करतो आणि ती सरकारकडे जमा करतो.
कोणावर लागू? : दारू, तेंदू पत्ता, भंगार, लाकूड, तसेच 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची मोटार गाडी, परदेशी टूर पॅकेज यांसारख्या विशिष्ट व्यवहारांवर टीसीएस लागू होतो.
जबाबदारी कोणाची? : जो वस्तू विकतो (Collector), त्याची जबाबदारी असते की त्याने खरेदीदाराकडून कर गोळा करून सरकारकडे जमा करावा.
उदाहरण : तुम्ही जर 15 लाखांची गाडी खरेदी करत असाल, तर कार डीलर तुमच्याकडून गाडीच्या किमतीसोबत 1% टीसीएस (म्हणजे 15,000) अतिरिक्त गोळा करेल आणि ही रक्कम सरकारकडे जमा करेल.
अनेकदा टीडीएस आणि टीसीएस यांना ‘अप्रत्यक्ष कर’ (Indirect Tax) म्हटले जाते; पण
टीडीएस आणि टीसीएस हे दोन्ही ‘प्रत्यक्ष कर’ (Direct Tax), म्हणजेच आयकर (Income Tax) गोळा करण्याच्या पद्धती आहेत. तुम्ही भरलेला टीडीएस किंवा टीसीएस हा तुमचा ‘अॅडव्हान्स टॅक्स’ मानला जातो आणि आयकर रिटर्न भरताना तुम्ही भरलेल्या एकूण करातून ही रक्कम वजा करून घेऊ शकता.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, टीडीएस हा तुमच्या उत्पन्नावरील कर आहे जो तुम्हाला मिळण्याआधीच कापला जातो, तर टीसीएस हा तुम्ही केलेल्या खर्चावरील कर आहे, जो तुमच्याकडून अतिरिक्त गोळा केला जातो. दोन्हीचा उद्देश एकच आहे - ‘जसे कमवाल तसा कर भरा’ या तत्त्वावर सरकारपर्यंत महसूल पोहोचवणे. एक जागरूक नागरिक म्हणून, आपला किती टीडीएस किंवा टीसीएस कापला गेला आहे, हे फॉर्म 26 AS किंवा वार्षिक माहिती विवरण (AIS) मध्ये तपासून पाहणे आणि आयकर रिटर्नमध्ये त्याचे योग्य क्रेडिट घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे आपले आर्थिक नियोजन अधिक सुकर होते.
फायदे :
सरकारसाठी : सरकारला वर्षभर नियमितपणे महसूल मिळतो आणि करचुकवेगिरीला आळा बसतो.
करदात्यासाठी : वर्षाच्या शेवटी एकदम मोठा कर भरण्याचा बोजा कमी होतो. कारण, कर हप्त्या-हप्त्याने कापला/गोळा केला जातो.
तोटे :
व्यवसायांसाठी : कर कापण्याची/गोळा करण्याची, तो वेळेवर भरण्याची आणि त्याचे विवरणपत्र (Return) दाखल करण्याची अतिरिक्त जबाबदारी येते.
नागरिकांसाठी : टीडीएसमुळे हातात येणारी रक्कम कमी होते. जर तुमचा कर कमी असेल, तर परतावा (Refund) मिळेपर्यंत पैसे अडकून राहतात. टीसीएसमुळे वस्तू खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागतात.
अतिरिक्त महत्त्वाचे बदल - एप्रिल 2025 पासून
ज्येष्ठांसाठी बँकेतील व्याजावर TDS सवलत 1,00,000 वरून लागू.
लॉटरी/गेमिंगवरील टीडीएस स्वतंत्र ट्रॅन्झॅक्शन 10,000 वरून लागू.
विमा, दलाली शाखांसाठी सवलत रु.20,000 पर्यंत वाढवली.