

Gold Price Prediction
पुढील काही दिवसात सोन्याचा दर कसा राहील?, याबाबत वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) ने त्यांच्या रिपोर्टमधून मत व्यक्त केले आहे. सध्याच्या बाजारातील मत लक्षात घेता या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत सोन्याचा दर एका मर्यादेत वाढण्याची शक्यता आहे. जो सध्याच्या दराच्या पातळीपेक्षा ०-५ टक्क्यांनी जास्त राहील, असे डब्ल्यूजीसीने रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सध्याच्या स्तरावरुन सोन्याच्या दरात ०-५ टक्के वाढ झाल्यास सोन्याच्या दरात वार्षिक २५ ते ३० टक्के वाढ होऊ शकते.
"या संमिश्र स्वरुपाच्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मध्यवर्ती बँका चौथ्या तिमाहीच्या अखेरीस सावध भूमिका घेत व्याजदर कमी करण्यास सुरुवात करतील असे अपेक्षित आहे. तर अमेरिकेची फेडरल रिझर्व्हकडून वर्षाच्या अखेरीस व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची शक्यता आहे," असे WGC ने म्हटले आहे.
जर का फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केली आणि अनिश्चितता कायम राहिल्यास गुंतवणूकदार सोन्याकडे वळतील. परिणामी सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज डब्ल्यूजीसीने व्यक्त केला आहे.
२०२५ च्या पहिल्या सहामाहीत सोन्याच्या दरात सुमारे २६ टक्क्यांनी वाढ झाली. कमकुवत अमेरिकन डॉलर, एका मर्यादेत राहिलेला व्याजदर, भू-राजकीय तणाव ही सोने दरवाढीमागील कारणे आहेत. दरम्यान, २०२५ मध्ये आतापर्यंत सोन्याने गुंतवणूकदारांना २९ टक्के परतावा मिळवून दिला आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ९७,३७० रुपयांवर खुला झाला. २२ कॅरेट ८९,१९१ रुपये, १८ कॅरेट ७३,०२८ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ५६,९६२ रुपयांवर खुला झाला.