

Stock Market Today: मंथली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने सुस्त आणि सावध सुरुवात केली. GIFT निफ्टी सपाट होता आणि निफ्टी 26,000 च्या खाली ट्रेड करत होता. काल वाढलेले IT शेअर्स आज घसरले आहेत, तर मेटल आणि फार्मा इंडेक्समध्ये वाढ झाली.
अमेरिकन बाजारांमध्ये कालच्या सत्रात टेक शेअर्स वाढले. टेक-हेवी नॅस्डॅक तब्बल 600 अंकांनी वाढला. डाओ जोंसही 200 अंकांनी वाढून हिरव्या रंगात बंद झाला. मात्र आज जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या रिटेल सेल्स व महत्त्वाच्या महागाई आकड्यांपूर्वी डाओ फ्युचर्स सुस्त असल्याने जागतिक गुंतवणूकदार सावध झाले आहेत.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या फोन कॉलमध्ये रशिया–युक्रेन युद्ध, फेंटानिल संकट आणि कृषी व्यापारावर चर्चा झाली. ट्रंप यांनी द्विपक्षीय संबंध “अत्यंत मजबूत” असल्याचे सांगत सकारात्मक संकेत दिले, ज्याचा फायदा आशियाई बाजारांना झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 70 डॉलरने वाढून 4175 डॉलरपर्यंत पोहोचले, तर चांदीत जवळपास 2.5% वाढ झाली. मात्र भारतात विरुद्ध चित्र दिसले, सोने 300 रुपयांनी घसरून 1,23,900 च्या खाली तर चांदी 400 रुपयांनी घसरून 1,54,500 च्या खाली बंद झाली.
MSCI रीबॅलेंसिंगमुळे परकीय गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 4200 कोटींची जोरदार विक्री केली. देशांतर्गत फंडांनी सलग 61व्या दिवशीही बाजारात खरेदी करत 4500 कोटींची गुंतवणूक केली. DIIs चा हा सातत्यपूर्ण सपोर्ट भारतीय बाजाराला आधार देत आहे.
वाणिज्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज होणाऱ्या Board of Trade च्या बैठकीत अमेरिकेच्या वाढत्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर भारताच्या निर्यातीला बळ कसे देता येईल यावर चर्चा होईल. निर्यात वाढीसाठी आणि इतर महत्त्वाच्या सेक्टरसाठी धोरणात्मक निर्णय या बैठकीत होऊ शकतो.