

Stock Market Today: शेअर बाजारातील घसरण आजही कायम आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. सकाळच्या सत्रात निफ्टी 14 अंकांनी घसरून 25,669 वर उघडला, तर सेन्सेक्स 140 अंकांच्या घसरणीसह 83,435 वर उघडला. सुरुवातीच्या काही मिनिटांतच विक्रीचा दबाव वाढला आणि निफ्टी सुमारे 85 अंकांनी घसरत 25,600 च्या खाली आला.
मागील आठवड्यात शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळाली. निफ्टीने इंट्राडेमध्ये 26,373 चा नवा उच्चांक गाठला होता, मात्र त्यानंतर जोरदार विक्रीमुळे बाजार घसरला आणि आठवड्याचा शेवट 25,683 वर झाला. शुक्रवारी निफ्टीत 193 अंकांची घसरण झाली होती. संपूर्ण आठवड्याचा विचार केला तर निफ्टीमध्ये सुमारे 2.5 टक्के, मिडकॅपमध्ये 2.6 टक्के आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये तब्बल 3.9 टक्के घसरण झाली.
जागतिक बाजारांकडून मात्र मिश्र संकेत मिळत आहेत. अमेरिकन बाजारात S&P 500 आणि डाओ जोन्स हे निर्देशांक नव्या उच्चांकावर बंद झाले. नॅस्डॅकही जोरदार तेजी दाखवत गेल्या तीन महिन्यांतील उच्चांकावर बंद झाला. मात्र भू-राजकीय घडामोडी गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड आणि इराणवर हल्ल्याची धमकी दिल्यामुळे जागतिक बाजारात अस्वस्थता वाढली आहे. व्हेनेझुएलावर झालेल्या कारवाईनंतर अशा धमक्यांकडे बाजार गांभीर्याने पाहत आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता असून, त्याचा फटका भारतीय शेअर बाजार आणि रुपयाला बसू शकतो.
शेअर बाजारात घसरणीचा दबाव कायम असताना व्यवहार सुरू होताच अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात दिसून आले. बीएसईच्या लार्ज कॅपमध्ये BEL, Adani Ports आणि PowerGrid या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. BEL सुमारे 1.70 टक्के, Adani Ports 1.50 टक्के तर PowerGrid जवळपास 1.20 टक्क्यांनी खाली होते.
मिडकॅप शेअर्समध्ये घसरण अधिक तीव्र होती. BHEL सुमारे 4 टक्क्यांनी घसरला, तर IPCA Labs, Ola Electric, Power India आणि UBL या शेअर्समध्येही 2 ते 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
स्मॉलकॅप विभागात मात्र विक्रीचा जोर अधिक दिसून आला. Kernex चा शेअर तब्बल 12 टक्क्यांनी कोसळला, तर Tejas Networks मध्ये सुमारे 8 टक्क्यांची मोठी घसरण झाली. एकूणच बाजारातील नकारात्मक वातावरणाचा फटका लार्जकॅपपासून स्मॉलकॅपपर्यंत सर्वच विभागांना बसल्याचं चित्र दिसत आहे.