Stock Market: शेअर बाजार 5 दिवसांत दोन महिने मागे गेला; गुंतवणूकदारांचे करोडो रुपयांचे नुकसान, आता काय करावं?

Why Indian Stock Market Is Falling: सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे भारतीय शेअर बाजार दोन महिने मागे गेला आहे. सेन्सेक्स 84 हजारांच्या खाली घसरला असून निफ्टीतही मोठी घसरण दिसत आहे.
Why Indian Stock Market Is Falling
Why Indian Stock Market Is FallingPudhari
Published on
Updated on

Why Indian Stock Market Is Falling: भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण सुरूच असून, या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी सेन्सेक्समध्ये 450 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली आणि तो थेट 84 हजारांच्या खाली घसरला. विशेष म्हणजे, जवळपास दोन महिन्यांनंतर सेन्सेक्स पुन्हा 83 हजारांच्या पातळीवर आला आहे. याआधी 11 नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स या स्तरावर होता.

घसरणीमुळे बाजार दोन महिने मागे

गेल्या पाच दिवसांत शेअर बाजारात दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या काळात गुंतवणूकदारांचे तब्बल 11.56 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. गुरुवारीच सेन्सेक्समध्ये 700 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती. म्हणजे अवघ्या दोन दिवसांत सेन्सेक्स सुमारे 1,200 अंकांनी खाली आला आहे.

सेन्सेक्स-निफ्टीची आजची स्थिती

शुक्रवारी सेन्सेक्स सुमारे 470 अंकांनी घसरून 83,708 च्या आसपास पोहोचला. दुपारी 12 वाजता सेन्सेक्स 438 अंकांच्या घसरणीसह 83,737 च्या आसपास व्यवहार करत होता. सकाळी सेन्सेक्स 84,022 वर उघडला होता, तर काल तो 84,181 वर बंद झाला होता.

दुसरीकडे निफ्टीमध्येही घसरण कायम राहिली. व्यवहारादरम्यान निफ्टी 141 अंकांनी घसरून 25,735 पर्यंत आला. दुपारी निफ्टी 122 अंकांच्या घसरणीसह 25,761 च्या आसपास होता. 2 जानेवारीला निफ्टी 26,328 वर होता, म्हणजे पाच दिवसांत जवळपास 600 अंकांची घसरण झाली आहे.

Why Indian Stock Market Is Falling
Shinde Raut Viral Video: संजय राऊत समोर येताच शिंदेंनी केला नमस्कार; तब्येतीची विचारपूस अन्..., व्हिडिओ व्हायरल

शेअर बाजार घसरण्याची प्रमुख कारणे

परदेशी गुंतवणूकदारांची विक्री:

परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) सातत्याने शेअर्स विकत आहेत. गुरुवारी त्यांनी सुमारे 3,367 कोटी रुपयांची विक्री केली. जानेवारी महिन्यात आतापर्यंत एफआयआयनी 8,080 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाजारातून काढली आहे.

अमेरिकेतील टॅरिफबाबत अनिश्चितता:

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफबाबत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. जर हे टॅरिफ बेकायदेशीर ठरले, तर अमेरिकेला आयातदारांना मोठी रक्कम परत द्यावी लागू शकते. या अनिश्चिततेचा जागतिक बाजारांवर परिणाम होत आहे.

भारतावर संभाव्य टॅरिफची भीती:

रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यामुळे भारतावर जादा टॅरिफ लावले जाऊ शकतात, अशा चर्चांमुळेही बाजारात दबाव निर्माण झाला आहे. अंदाजानुसार टॅरिफ 500 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, ही भीती गुंतवणूकदारांना आहे.

Why Indian Stock Market Is Falling
Pune Viral Video: बाल्कनीत अडकले, घरातलं कोणी उठेना; मदतीसाठी थेट Blinkit ला केला फोन, Viral Video

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या:

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचा दर 0.53 टक्क्यांनी वाढून सुमारे 62.32 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारताचा आयात खर्च आणि महागाई वाढण्याची शक्यता असते, ज्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होतो.

रुपयाची घसरण:

परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रुपयावरही दबाव आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांनी घसरून 89.97 पर्यंत गेला.

गुंतवणूकदारांचे किती नुकसान?

आकडे पाहिले तर 2 जानेवारी रोजी बीएसईचे एकूण मार्केट कॅप सुमारे 481.24 लाख कोटी रुपये होते. ते 9 जानेवारीपर्यंत घसरून सुमारे 469.69 लाख कोटी रुपयांवर आले. म्हणजेच अवघ्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांचे सुमारे 11.56 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुंतवणूकदारांनी आता काय करावं?

1. घाईघाईने विक्री करू नका

बाजार घसरला म्हणून घाबरून शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकणे चुकीचे आहे. अशा घसरणी तात्पुरत्या असतात. इतिहास सांगतो की बाजार पुन्हा सावरतो.

2. दीर्घकालीन गुंतवणूक असल्यास ‘शांत रहा’

तुमची गुंतवणूक 5–10 वर्षांच्या दृष्टीने असेल, तर रोजचा सेन्सेक्स-निफ्टी पाहून निर्णय घेऊ नका.

3. SIP चालू ठेवा, थांबवू नका

म्युच्युअल फंड SIP बंद करणं हा पण चुकीचा निर्णय असतो. बाजार खाली आल्यास SIPला फायदा होतो.

4. कर्ज काढून गुंतवणूक करु नका

या काळात “हा शेअर लगेच दुप्पट होईल” अशा टिप्सपासून दूर राहा. कर्ज काढून गुंतवणूक करणे किंवा सोशल मीडियावरील अफवांवर निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते.

5.पोर्टफोलिओचा आढावा घ्या

सगळी गुंतवणूक एका सेक्टरमध्ये असेल, तर धोका वाढतो. इक्विटी, डेट, गोल्ड यांचा समतोल आहे का, हे तपासा.

6. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा

जर नव्याने पैसे टाकायचे असतील, तर एकदम न टाकता 2–3 टप्प्यांत गुंतवणूक करा. यामुळे धोका कमी होतो.

एकूणच, जागतिक अनिश्चितता, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयावरील दबाव यामुळे सध्या शेअर बाजार अडचणीत सापडलेला आहे. पुढील काही दिवसांत जागतिक घडामोडी आणि धोरणात्मक निर्णयांवर बाजाराची दिशा ठरणार आहे.

नोंद- गुंतवणूक कराताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news