

Ladki Bahin Yojana Installment Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिला पुढील हप्त्याची वाट पाहात आहेत. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार? गेल्या दोन महिन्यांपासून ₹1500 ची रक्कम खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक लाभार्थी संभ्रमात आहेत.
मात्र आता महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी राजकीय व प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी दावा केला आहे की, पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा मिळून एकत्र हप्ता जमा केला जाईल. जर हा दावा खरा ठरला, तर लाभार्थी महिलांना एकाच वेळी ₹ 3,000 मिळू शकतात.
मात्र दुसरीकडे महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे निधी वितरणात काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 15 जानेवारी रोजी महापालिका व नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत.
या योजनेतील काही लाभार्थी महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे अशा महिलांचा हप्ता तात्पुरता थांबवला जाऊ शकतो. लाडकी बहिण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 होती आणि ती पुढे वाढवण्यात आलेली नाही. सध्या योजनेच्या संकेतस्थळावरूनही ई-केवायसीचा पर्याय काढून टाकण्यात आला आहे.
सरकारने जून 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे दिले जातात. आता सर्वांचे लक्ष 14 जानेवारीकडे लागले असून, सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा कधी होते, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष आहे.