

नगर: महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी 17 प्रभागांमध्ये 345 मतदान केंद्रांवर सुविधा असणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे.
मतदान प्रक्रियेनंतर सर्व ईव्हीएम मशीन एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या 6 नंबरच्या गोडाऊनमध्ये केलेल्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. 16 जानेवारीला सकाळी 10 वाजता 7 नंबर गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार असून, त्याची तयारीही प्रशासनाकडून पूर्ण झाली असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
मतदान प्रक्रियेसाठी 1800 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच, प्रत्यक्ष मतमोजणीसाठी 68 मतमोजणी पर्यवेक्षक व 68 मतमोजणी सहायक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मतमोजणीची प्रक्रिया 16 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. सकाळी 9.30 वाजता स्ट्राँग रूम उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या, तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने व निवडणूक निरीक्षक श्रीमंत हारकर यांच्या समक्ष उघडण्यात येणार आहे. सर्वप्रथम सकाळी 10 वाजता टपाली मतपत्रिका मोजण्यास सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल.
तयारी अशी...
सर्व 17 प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे.
प्रत्येक प्रभागासाठी पोस्टल मतदानासाठी एका टेबलावर व ईव्हीएम मशीनसाठी 3 टेबलावर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
17 प्रभागासाठी पोस्टल मतदानासाठी 17 टेबल व ईव्हीएम मशीनसाठी प्रत्येक प्रभागासाठी तीन असे 51 टेबल असून एकूण 68 टेबलावर मतमोजणी होणार आहे.
उमेदवार किंवा त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी ओळखपत्र देतील. त्यांनी तशी मागणी नोंदवावी.
ओळखपत्राशिवाय मतमोजणी केंद्रावर व आवारात प्रवेश दिला जाणार नाही.
मतमोजणी केंद्रात मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड नेता येणार नाहीत.
माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी अद्ययावत पत्रकार कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.