Stock Market Today: शेअर बाजाराची संमिश्र सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी सपाट, बँक निफ्टीत चढ-उतार, IT शेअर्स तेजीत
Stock Market Today: आज शेअर बाजाराची सुरुवात हलक्या वाढीसह झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक पहिल्या काही मिनिटांत हिरव्या रंगात होते, मात्र नंतर व्यवहार सपाट दिसून आला. बँक निफ्टीमध्ये सुरुवातीला तेजी होती, पण नंतर तोही घसरत असल्याने बाजारात चढ-उतार कायम राहिले.
सकाळी साधारण 9.25 वाजता सेन्सेक्स सुमारे 120 अंकांनी वाढून 82,427 च्या आसपास व्यवहार करत होता. तर निफ्टी सुमारे 40 अंकांनी वाढून 25,330 च्या आसपास होता. बँक निफ्टीही किंचित वाढीसह 59,200 च्या आसपास दिसला. बाजारातील अस्थिरतेचा अंदाज देणारा India VIX निर्देशांकही वाढताना दिसला.
IT आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी
आजच्या व्यवहारात सुरुवातीपासून IT आणि मेटल शेअर्समध्ये खरेदीचा कल दिसला. निफ्टी 50 मधील काही शेअर्स तेजीत होते, त्यामध्ये Dr Reddy’s, Hindalco, TCS, Wipro, Cipla, HCL Tech, Tech Mahindra आणि Bajaj Auto यांचा समावेश होता. तर दुसरीकडे Indigo, SBI Life, Adani Ports, Power Grid, Axis Bank, Apollo Hospital यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाली. चलन बाजारात रुपया किंचित वाढला. आज रुपया डॉलरच्या तुलनेत 13 पैशांनी मजबूत होत 91.50 प्रति डॉलरवर उघडला.
जागतिक बाजारातील संकेत
जागतिक बाजारांकडून आजचे संकेत बर्यापैकी सकारात्मक आहेत. ग्लोबल टेन्शन कमी होण्याच्या शक्यतेमुळे अमेरिकन बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाले. डाओ जोंस आणि नॅस्डॅक दोन्हीमध्ये चांगली वाढ झाली. GIFT निफ्टी जवळपास सपाट राहिला.
सोन्या-चांदीमध्ये जोरदार तेजी
सुरक्षित गुंतवणुकीची (Safe Haven) मागणी वाढल्यामुळे सोन्या-चांदीने नवा उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली, तर चांदीही वेगाने वाढली. देशांतर्गत बाजारातही सोनं आणि चांदी दोन्ही महाग झालं. दुसरीकडे ब्रेंट क्रूडमध्ये घसरण झाली. कच्चं तेल स्वस्त झाल्यामुळे भारतासाठी हा पॉझिटिव्ह संकेत मानला जातो.
रशिया-युक्रेन युद्धाबाबत सकारात्मक चर्चा
रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेच्या बातम्यांमुळे जागतिक बाजारातील घसरण थांबली आहे. रशिया-युक्रेन युद्धाबाबत चर्चेचा मार्ग निघू शकतो, अशी आशा व्यक्त केली जात असल्याने गुंतवणूकदारांचा ‘रिस्क सेंटिमेंट’ थोडा सुधारला आहे.
FII विक्री सुरूच, पण DIIचा आधार
परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) अनेक दिवस विक्री चालू ठेवली आहे. मात्र दुसरीकडे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) सलग 102व्या दिवशीही खरेदी करत आहेत, त्यामुळे बाजाराला आधार मिळत आहे.
आज निकालांवरही बाजाराचे लक्ष
कंपन्यांच्या तिमाही निकालांचाही बाजारावर परिणाम होत आहे. काही कंपन्यांचे निकाल चांगले तर काहींचे कमकुवत आहेत. आजच्या दिवशीही काही मोठ्या कंपन्यांचे निकाल येणार असल्याने संबंधित शेअर्समध्ये हालचाल वाढू शकते.

