

Balasaheb Thackeray Resign as Shiv Sena Chief: मुंबईच्या राजकारणात शिवसेनेचा इतिहास जितका संघर्षाचा आहे, तितकाच तो विलक्षण घटनांनी भरलेला आहे. त्यातली एक घटना आजही अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. हजारो शिवसैनिकांसमोर उभं राहून बाळासाहेबांनी राजीनामा जाहीर केला होता. पुढे काय घडलं, आणि हा निर्णय मागे का घ्यावा लागला हे जाणून घेऊया.
शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली. त्यानंतर अवघ्या काही वर्षांतच मुंबईत शिवसेनेचा प्रभाव वाढू लागला. 1973च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 40 जागा मिळाल्या. त्या काळात ही मोठी कामगिरी होती. कारण शिवसेना हा नवा पक्ष होता आणि मुंबईसारख्या शहरात स्वतःचं स्थान निर्माण करणं सोपं नव्हतं. पण शिवसेनेच्या आक्रमक शैलीने आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर पक्ष वेगाने वाढला.
त्या निवडणुकीनंतर शिवसेनेला असं वाटू लागलं की आता मुंबई आपल्या ताब्यात आहे. पण पुढच्या काही वर्षांत देशाच्या राजकारणात झालेल्या एका मोठ्या निर्णयामुळे सगळी समीकरणं बदलली.
1975 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. अनेक पक्षांनी आणि नेत्यांनी आणिबाणीला विरोध केला. पण त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला. या भूमिकेचा शिवसेनेला पुढे मोठा फटका बसला. कारण आणीबाणी उठल्यानंतर देशात राजकीय वातावरण बदललं. लोकांमध्ये आणीबाणीविरोधी भावना तीव्र झाली आणि अनेक पक्षांनी त्या लाटेत मोठी झेप घेतली.
त्याच काळात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. हा पराभव शिवसेनेसाठी अत्यंत धक्कादायक होता.
या अपयशानंतर बाळासाहेब अधिकच संतप्त आणि अस्वस्थ झाले. शिवसेनेची ताकद ही मुंबईत होती. त्यामुळे मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठा होती. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी घोषणा केली, “मुंबई महापालिका जर हरलो, तर मी शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देईन.”
1978 ची मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी निर्णायक ठरली. त्या निवडणुकीत शिवसेनेला फक्त 22 जागा मिळाल्या. म्हणजे 1973 मधल्या 40 जागांवरून पक्ष खाली घसरला होता. या निकाला नंतर त्यांना संताप झाला.
निकालानंतर झालेल्या एका मोठ्या सभेत बाळासाहेबांनी जे केलं, ते आजही लोकांना धक्का देणारं आहे. सभेत, हजारो शिवसैनिकांसमोर त्यांनी थेट जाहीर केलं, “मी शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देतो.”
बाळासाहेबांनी राजीनामा जाहीर करताच सभेचं वातावरण बदललं. हजारो शिवसैनिक अक्षरशः भावूक झाले. अनेकांनी विरोध केला. शिवसैनिक म्हणाले “आमच्या प्रेतावरून जा, पण राजीनामा देऊ नका.” शिवसैनिक विनवण्या करत असतानाही बाळासाहेब ठाम राहिले. शेवटी शिवसैनिकांनी एकत्र येऊन प्रतिज्ञा केली “मुंबई महापालिकेतला भगवा कधीच खाली येऊ देणार नाही!” तेव्हा बाळासाहेबांनी राजीनामा मागे घेतला. शिवसैनिकांनी दिलेला शब्द अक्षरशः खरा केला. 1985 पासून 2022 पर्यंत मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच मराठी महापौर बसला.