

Sanjay Raut vs Balasaheb Thackeray: संजय राऊत यांचं नाव आलं की राजकारणात हमखास चर्चा रंगते. कुणी त्यांच्यावर टीका करतो, तर कुणी त्यांना शिवसेनेचा आवाज मानतो. पण एक गोष्ट नाकारता येत नाही, संजय राऊत हे अनेक वर्षांपासून ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या वर्तुळातले आणि शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून ओळखले जातात. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात एकदा जोरदार मतभेद झाले होते, हा जुना किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
संजय राऊत यांचं बालपण मुंबईतील माहिम परिसरात गेलं. त्यांच्या वडिलांचं नाव राजाराम राऊत असून ते कामगार चळवळीत सक्रिय होते. त्यामुळे घरातूनच राऊतांना संघटन, लोकांशी संपर्क आणि राजकारणाचं बाळकडू मिळालं. राजाराम राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे घरगुती संबंध होते.
संजय राऊतांनी शिक्षणानंतर पत्रकारितेत पाऊल ठेवलं. सुरुवातीला क्राइम रिपोर्टिंगपासून सुरुवात झाली, पण पुढे राजकीय रिपोर्टिंगमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली.
काळानुसार त्यांच्या लिखाणाची शैली आक्रमक होत गेली, थेट, धारदार आणि मुद्देसूद. याच शैलीमुळे राऊतांवर बाळासाहेबांची नजर होती आणि पुढे त्यांना ‘सामना’मध्ये मोठी जबाबदारी मिळाली. कमी वयातच त्यांनी ‘सामना’च्या संपादकीय विभागात महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि तिथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.
बाळासाहेबांच्या भाषणशैलीला जसं महाराष्ट्रात वजन होतं, तसंच सामनाच्या शब्दांनाही ताकद होती. ही ताकद अधिक धारदार होण्यात राऊतांचा मोठा वाटा मानला जातो. एकेकाळी “सामनात छापलेला शब्द म्हणजे सेनेचा आवाज” अशी प्रतिमा निर्माण झाली होती.
पण हे सगळं सुरळीतच होतं असं नाही.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त यांचं नाव आल्यानंतर मुंबईत वातावरण तापलं होतं. त्या काळात शिवसेनेकडून संजय दत्तविरोधात भूमिका घेतली जात होती आणि सामनामधूनही आक्रमक लिखाण होत होतं.
पण नंतर बाळासाहेब ठाकरे आणि संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त यांची भेट झाली. त्या भेटीनंतर बाळासाहेबांनी आपली भूमिका काहीशी बदलली आणि संजय दत्तबाबत मवाळ भूमिका घेतली. याच मुद्द्यावरून संजय राऊत नाराज झाले होते.
बाळासाहेबांनी संजय दत्तबाबत भूमिका बदलल्यानंतरही सामनात संजय राऊत यांनी विरोधी लेख लिहिला होता. त्यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. यावेळी माँसाहेब (मीना ठाकरे) यांनी मध्यस्थी करून दोघांमधला वाद मिटवला होता.
संजय राऊतांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कायम चर्चेत राहतात, स्पष्ट बोलतात आणि पक्षाची बाजू मांडताना मागे हटत नाहीत. शिवसेनेत अनेक नेते आले-गेले, समीकरणं बदलली, राजकारणात उलथापालथ झाली… पण संजय राऊत आजही शिवसेनेचा (ठाकरे गटाच्या) प्रमुख आवाज आहेत.