

Stock Market Today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक बाजारांतील प्रॉफिट बुकिंग, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि गुंतवणूकदारांचा मूड यामुळे बाजारावर दबाव दिसून आला. सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स सुमारे 220 अंकांनी घसरून 84,700 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टीही 70 हून अधिक अंकांनी खाली येत 26,060 च्या पातळीवर होता. बँक निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची घसरण झाली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही आज फारसा उत्साह दिसला नाही. अस्थिरतेचा निर्देशांक असलेला इंडिया VIX सुमारे 1 टक्क्यांनी वाढला असून गुंतवणूकदारांची चिंता वाढल्याचं चित्र आहे.
बुधवारी संध्याकाळी सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी पहिला अॅडव्हान्स GDP अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था सुमारे 7.4 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुधारणा प्रक्रियेमुळे देशाची आर्थिक गती मजबूत असल्याचं म्हटलं आहे. मात्र, हा सकारात्मक संकेत असूनही आजच्या व्यवहारात त्याचा फारसा फायदा बाजाराला मिळालेला दिसत नाही.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) सलग तिसऱ्या दिवशी विक्री करत असल्याने बाजारावर दबाव कायम आहे. FIIs नी सुमारे 4,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम बाजारातून काढून घेतली. मात्र, याच्या उलट देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) आपला विश्वास कायम ठेवत सलग 92व्या दिवशी खरेदी सुरू ठेवली असून जवळपास 2,900 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
अमेरिकेतील शेअर बाजारांमध्येही प्रॉफिट बुकिंग दिसून आली. डाओ जोन्सने इंट्राडेमध्ये ऑल टाइम हाय गाठल्यानंतर दिवसअखेरीस त्यात सुमारे 460 अंकांची घसरण झाली. S&P 500 देखील विक्रमी पातळीवरून खाली आला. नॅस्डॅकमध्ये मात्र मर्यादित वाढ दिसली, पण दिवसभर चढ-उतार कायम होते.
कमोडिटी बाजारातही तीव्र चढ-उतार पाहायला मिळाले. चांदीने व्यवहारादरम्यान नवा उच्चांक गाठल्यानंतर मोठी घसरण नोंदवली आणि सुमारे 6,500 रुपयांनी खाली आली. सोन्याच्या दरातही जवळपास 1,000 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीवर दबाव दिसून आला.
एकूणच, GDP बाबत सकारात्मक अंदाज असूनही जागतिक संकेत, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि कमोडिटी बाजारातील अस्थिरता यामुळे शेअर बाजारावर आज दबाव कायम असल्याचं चित्र आहे.