

Raj Uddhav Thackeray Alliance: तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ पुन्हा एकत्र आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती जाहीर झाली असून, त्यानिमित्ताने दोघांची संयुक्त मुलाखत झाली. या मुलाखतीत ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यामागचं कारण सांगितलं आहे.
या मुलाखतीत संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी थेट प्रश्न विचारला की, “एकत्र यायला 20 वर्ष का लागली?” या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, भूतकाळात काय घडलं यावर आता अडकून राहण्यात अर्थ नाही. आज परिस्थिती इतकी गंभीर आहे की महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. हे केवळ वैयक्तिक मतभेदांचं प्रकरण नाही, तर मराठी अस्मितेचं प्रकरण आहे. वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा आता एकत्र उभं राहणं गरजेचं होतं'', असं त्यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे यांनीही याला दुजोरा दिला. दोन भाऊ एकत्र आले, हा भावनिक क्षण असला तरी त्यामागचा खरा हेतू मोठा आहे, असं ते म्हणाले. जर मराठी माणूस आपापसात विभागला, तर बाहेरचे लोक महाराष्ट्राचा फायदा घेत राहतील. म्हणूनच पक्ष, अहंकार आणि जुने वाद बाजूला ठेवून मराठी माणसासाठी एकत्र येणं आवश्यक होतं, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप करताना महाराष्ट्रात लोकसंख्येचं संतुलन बिघडवलं जात असल्याचं म्हटलं. बाहेरून मोठ्या प्रमाणात लोक येत असून त्यातून नवीन मतदारसंघ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई आणि MMR भागावर राजकीय ताबा मिळवून ती महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची मानसिकता आजही जिवंत आहे, असा गंभीर दावा त्यांनी केला.
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच इशारा दिला, आज जर आपण एकत्र लढलो नाही, तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही. मुंबई, ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्र वाचवण्यासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता. ही युती राजकारणासाठी नसून महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आहे, असा स्पष्ट मेसेज त्यांनी दिला.