

Raj-Uddhav Thackeray Interview Teaser: मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन दशकांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याचं चित्र आहे. शिवसेना–मनसे युतीची घोषणा, येऊ घातलेल्या संयुक्त सभा आणि त्याआधीच समोर आलेली ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात दोन्ही भावांची आक्रमक आणि रोखठोक भूमिका पाहायला मिळते.
या मुलाखतीत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर “भ्रष्टाचार आणि गोंधळाची युती” अशी टीका केल्यानंतर राज ठाकरे यांनी थेट प्रत्युत्तर दिलं. “भ्रष्टाचाराबद्दल फडणवीसांनी बोलूच नये,” असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. राज्यात सत्तेत बसलेले अनेकजण हे ‘बसवलेले’ आहेत आणि ते फक्त आपल्या धन्याचंच ऐकतात, असा आरोप करत राज ठाकरे यांनी सध्याच्या सत्ताधारी नेत्यांवर टीका केली.
राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत असल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी परखड भाष्य केलं. या बिनविरोध निवडणुकांमागे पैशांचा मोठा खेळ असल्याचा आरोप करत, नोटा वाटल्यामुळे लोकशाहीचाच अधिकार हिरावला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, “आमच्याकडे लोक फक्त तक्रार घेऊन येतात, पण मतं देताना मागे हटतात,” अशी खंतही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.
शहरांच्या अवस्थेबाबत बोलताना राज ठाकरे यांनी मुंबई आणि पुण्याच्या भविष्यासंदर्भात गंभीर इशारा दिला. “मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पण पुण्याला तितका वेळ लागणार नाही. पुणं फार लवकर बरबाद होईल,” असं म्हणत त्यांनी अनियंत्रित विकास आणि प्रशासनावर बोट ठेवलं. मुंबईकरांना नेमकं काय हवंय हे तिथे जन्माला आल्याशिवाय समजणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
या संवादात उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. सत्तेवर प्रेम असण्यापेक्षा राज्यावर प्रेम असायला हवं, असं सांगत त्यांनी सध्याच्या राजकारणावर सूचक विधान केलं. तर महेश मांजरेकर यांनी एक सामान्य मुंबईकर म्हणून आपली व्यथा मांडली. “आज घराबाहेर पडताना लाज वाटते,” असं सांगत त्यांनी वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि शहराच्या ढासळलेल्या अवस्थेवर थेट भाष्य केलं.
आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही संयुक्त मुलाखत आणि ठाकरे बंधूंची एकजूट राज्याच्या राजकारणात नवं समीकरण तयार करत असल्याचं चित्र आहे. 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार असून, त्याआधी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभा आणि ही मुलाखत मतदारांवर नेमका काय परिणाम करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.