

India Defence Budget 2026 Hike: भारत लवकरच आपला संरक्षण खर्च मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या तयारीत आहे. वाढत्या सुरक्षाविषयक आव्हानांमुळे येत्या आर्थिक वर्षात संरक्षण मंत्रालय केंद्र सरकारकडे तब्बल 20% बजेट वाढीची मागणी करणार आहे. जागतिक स्तरावर वाढलेल्या सैन्य खर्चाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालय ही मागणी करणार आहे.
संरक्षण सचिव आर.के. सिंह यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पुढील आर्थिक वर्षात संरक्षण बजेटमध्ये सुमारे 15.2 अब्ज डॉलरची अतिरिक्त वाढ होईल. या वाढीचा मोठा हिस्सा देशातील कंपन्यांकडून शस्त्र खरेदी करण्यासाठी वापरला जाणार आहे.
साधारणपणे दरवर्षी संरक्षण मंत्रालयाला 10% वाढ दिली जाते. मात्र सध्याच्या भूराजकीय तणाव, अस्थिर शेजारील देश आणि अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर लष्कराचे आधुनिकीकरण करणे आवश्यक असल्याने बजेट वाढीची मागणी केली जाणार आहे. स्टँड-ऑफ वेपन्स, आधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम, प्रगत ड्रोन क्षमता आणि तंत्रज्ञानावर भर दिला जाणार आहे.
चालू आर्थिक वर्षात संरक्षण मंत्रालयाला ₹8.17 लाख कोटी इतका निधी मिळाला असून त्यापैकी ₹27,886 कोटी खासगी भारतीय कंपन्यांकडून खरेदीसाठी राखीव ठेवला आहे. एकूण आधुनिकीकरणाच्या बजेटपैकी 75% हिस्सा देशांतर्गत खरेदीसाठी राखीव असताना प्रत्यक्षात ही खरेदी जवळपास 88% पर्यंत झाली आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली.
FICCI सेमिनारमध्ये बोलताना ते म्हणाले, “भारताचे शेजारील देश अतिशय संवेदनशील आणि कठीण परिस्थितीत आहेत. त्यामुळे यंदा आम्ही साधारण 10% ऐवजी 20% वाढीची मागणी करणार आहोत. आणि माझ्या मते, पुढील काही वर्षे ही वाढ किमान इतकी असायलाच हवी.” याचबरोबर त्यांनी शस्त्रपुरवठादार कंपन्यांना इशारा देत म्हटले की, वेळेवर वितरण न केल्यास दंड आकारला जाईल आणि कंत्राट रद्द करण्याची कारवाईही केली जाईल.