

नवी दिल्ली ः रशियाचे राष्ट्राध्यक्ष 4 डिसेंबरपासून दोन दिवसांच्या भारत दौर्यावर येत असून, दोन्ही देशांनी या दौर्याला पुष्टी दिली आहे. उभय राष्ट्रप्रमुखांमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्र करारासह उभय देशांतील संबंध मजबूत करण्यासह अन्य महत्त्वाचे अजेंडे चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहेत.
वार्षिक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा होईल. यावेळी दोन्ही नेते क्रूड ऑईल करार, संरक्षण आणि मुक्त व्यापार करारावर (एफटीए) यासह विविध विषयांवर चर्चा करू शकतात. पुतीन यांच्या या दौर्यात सर्वाधिक लक्ष संरक्षण करारावर असेल. सध्याची एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली, भविष्यातील एस-500 प्रणालीसाठी सहकार्य, ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पुढील आवृत्ती आणि दोन्ही देशांच्या नौदलांसाठी एकत्रितपणे युद्धनौका बनवण्यासारख्या योजनांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
ऊर्जा हा देखील या भेटीदरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा असेल. रशिया भारताला स्वस्त कच्चे तेल विकत आहे. परंतु, अमेरिका आणि युरोपीय देशांच्या दबावामुळे पेमेंटमध्ये अडचणी येत आहेत. पुतीन यांच्या या भेटीत दोन्ही देश एक नवीन पेमेंट प्रणाली तयार करण्यावर सहमत होऊ शकतात, ज्यामुळे व्यापार अखंडितपणे सुरू राहील. यात रुपया-रुबल व्यापार, डिजिटल पेमेंट किंवा तिसर्या देशाच्या बँकेचा वापर यांसारख्या प्रणालींचा समावेश असू शकतो. यासोबतच रशिया भारताला आर्कटिक प्रदेशातील ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीची संधीदेखील देऊ शकतो, जिथे रशिया जगातील मोठे तेल-वायू साठे विकसित करत आहे.
रशिया-युक्रेन युद्धानंतर पुतीन यांचा पहिला दौरा
या चर्चेव्यतिरिक्त, राष्ट्राध्यक्ष पुतीन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसाठी भारताच्या राष्ट्रपती मेजवानीचे आयोजन करतील. दरम्यान, 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून हा त्यांचा पहिला भारत दौरा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यापूर्वी 2021 मध्ये भारत दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी 21 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थिती लावली होती.