

BJP President Election 2025: बिहार विधानसभा निवडणुका संपताच दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे. आता भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याची चर्चा सध्या सुरु आहे. गेल्या वर्षापासून लांबलेली ही निवड प्रक्रिया अखेर गती घेण्याच्या तयारीत आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात परतल्यानंतर भाजपा मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्याचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा नियमित कार्यकाळ जून 2023 मध्येच संपला होता. मात्र लोकसभा निवडणुका, काही राज्यांतल्या विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना कार्यकाळ वाढवून देण्यात आला. भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक निवडणुका 29 राज्यांमध्ये पूर्ण झाल्या असून, फक्त उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसारखी काही प्रमुख राज्ये बाकी आहेत.
रविवारची बैठक राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी निर्णायक मानली जात आहे. केवळ राष्ट्रीय अध्यक्ष नव्हे, तर उत्तर प्रदेशाध्यक्ष, हरियाणा प्रदेशाध्यक्षही बदलू शकतात. हिंदू पंचांगानुसार खरमास 14 जानेवारीला संपत आहे, त्यामुळे अध्यक्षपदाची घोषणा 14 जानेवारीनंतर कधीही होऊ शकते असे बोलले जात आहे.
भाजपकडून कोणतेही अधिकृत संकेत मिळाले नसले तरी काही नावे चर्चेत आहेत—
धर्मेंद्र प्रधान – RSSशी संबंध, केंद्रात चांगली पकड
भूपेंद्र यादव – संघटनात्मक बांधणी, OBC समाजाचा लोकप्रिय चेहरा
शिवराज सिंह चौहान – अनुभवी आणि सर्वमान्य नेता
मनोहर लाल खट्टर – संघाच्या गोटातील विश्वासू
केशव प्रसाद मौर्य – यूपीतील OBC समाजाचा लोकप्रिय चेहरा
या नावांमध्ये कोणाचे नाव फायनल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अलीकडच्या कॅबिनेट बैठकीत बिहार निवडणूक विजयाबद्दल मंत्र्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. मोदी यांनी या वेळी एनडीए “ऑर्गेनिक, स्थिर आणि दीर्घकालीन” असल्याचा उल्लेख केला. त्यानंतर जेपी नड्डा यांनी बिहार विजयात योगदान देणाऱ्या नेत्यांसाठी खास डिनरचे आयोजन केले.
भाजपच्या संघटनेत मोठे बदल करण्याची तयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी लोकसभा सत्रे, राज्यांतल्या निवडणुका आणि संघटन विस्ताराच्या दृष्टीने नव्या अध्यक्षाची निवड पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.