

Gold Price Crash: सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांत विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आता सोन्याच्या किमतींवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील आर्थिक घडामोडी आणि व्याजदर वाढीच्या शक्यतेमुळे सोन्याचे दर आणखी घसरू शकतात, असा इशारा बाजार तज्ज्ञांनी दिला आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने 5,595 डॉलर प्रति औंस हा विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण झाली आहे. सध्या सोने आपल्या उच्चांकापेक्षा सुमारे 25 टक्के खाली व्यवहार करत आहे. त्यामुळे जास्त भावात सोने खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.
गेल्या आठवड्यात मात्र सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 4,222 डॉलर प्रति औंसच्या आसपास पोहोचला. भारतात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 1.17 टक्क्यांनी वाढून 10 ग्रॅममागे 1,50,675 रुपयांवर बंद झाले.
तज्ज्ञांच्या मते, सध्या सोन्यासमोर दोन मोठी आव्हाने उभी आहेत. पहिले म्हणजे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता. दुसरे म्हणजे डॉलरची वाढती ताकद. सामान्यतः व्याजदर वाढले की गुंतवणूकदारांचे लक्ष सोन्याऐवजी इतर व्याज मिळणाऱ्या गुंतवणूक पर्यायांकडे वळते. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होऊ शकते.
स्टेट स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे कमोडिटी विश्लेषक आकाश दोशी यांच्या मते, अमेरिकेतील व्याजदर आणि मजबूत डॉलर यामुळे सोन्यावर आणखी दबाव येऊ शकतो. त्यामुळे अल्पावधीत सोन्याच्या किमतींमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे, मध्यपूर्वेतील तणाव कमी झाला आणि कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 80 डॉलरच्या आसपास आल्या, तर सोन्या-चांदीत पुन्हा तेजी दिसू शकते. मात्र सध्या कच्च्या तेलाचे दर 90 डॉलरच्या आसपास असल्याने जागतिक महागाईची चिंता कायम आहे.
UBS या संस्थेनेही सोन्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, सोन्याचा भाव अल्पावधीत 3,850 ते 4,000 डॉलर प्रति औंस या पातळीपर्यंत घसरू शकतो. अमेरिकेत व्याजदर वाढल्यास सोन्यातील गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वाढत्या तेलाच्या किमतींमुळे जगभरात महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात किंवा चांदीत गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.