

RBI Bank Restrictions: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईस्थित मोगावीरा सहकारी बँकेवर कठोर निर्बंध घातले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्यामुळे आणि नियमांचे पालन न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्बंध 12 जूनपासून लागू झाले असून पुढील सहा महिन्यांसाठी राहणार आहेत.
RBIच्या आदेशानुसार, आता मोगावीरा सहकारी बँकेतील खातेदारांना त्यांच्या खात्यातून जास्तीत जास्त 1 लाख रुपयेच काढता येणार आहेत. ही मर्यादा बचत खाते, चालू खाते आणि इतर सर्व प्रकारच्या खात्यांसाठी लागू असेल. बँकेतील उपलब्ध रोख रक्कम संतुलित ठेवणे आणि ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचे RBIने स्पष्ट केले आहे.
याशिवाय बँकेला नवीन कर्ज मंजूर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. बँक कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही, तसेच जुन्या कर्जांचे नूतनीकरणही करू शकणार नाही. नवीन गुंतवणूक करणे, नवीन ठेवी स्वीकारणे किंवा कोणतीही नवीन आर्थिक जबाबदारी स्वीकारणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.
RBIने सांगितले की, गेल्या काही काळापासून बँकेच्या संचालक मंडळाशी आणि वरिष्ठ व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क ठेवून सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. मात्र, बँकेला आर्थिक स्थिती सुधारण्यात आणि नियामकांच्या चिंता दूर करण्यात यश आले नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या हितासाठी अखेर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय बँकेने स्पष्ट केले की, या कारवाईचा उद्देश बँक बंद करणे नसून तिची आर्थिक स्थिती अधिक बिघडू नये आणि ग्राहकांचे हित सुरक्षित राहावे हा आहे. बँकेच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असून परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जातील.
दरम्यान, RBIने खातेदारांना घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. मात्र, पुढील सहा महिन्यांत त्यांना नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्बंध कायम ठेवायचे की शिथिल करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल.