

Gold Adulteration Alert: सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्यामध्ये रेनियम आणि इरिडियम यांसारख्या धातूंची भेसळ करून दागिन्यांचे वजन वाढवले जात आहे. या संभाव्य प्रकाराबाबत ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (GJC) भारतीय मानक ब्युरोला (BIS) सतर्क केले आहे.
मात्र, या बातमीमुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सावध राहणे आणि सोने खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे, असे GJC ने सांगितले आहे. BIS या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत असून, ज्वेलर्सनाही सोन्याची गुणवत्ता तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, काही ठिकाणी सोन्यामध्ये रेनियम आणि इरिडियम या धातूंपासून तयार केलेल्या मिश्रधातूंचा वापर केला जात आहे. या धातूंची भेसळ करून सोन्याच्या दागिन्यांचे वजन वाढवले जात असल्याचा संशय आहे. यामध्ये दागिन्यांचे एकूण वजन वाढते. मात्र, त्यातील प्रत्यक्ष सोन्याचे प्रमाण कमी असते.
GJC चे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितले की, अशा बातम्यांमुळे संपूर्ण सराफा बाजाराने किंवा ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. BIS या प्रकरणाची गंभीर दखल घेत आहे.
सोन्यात भेसळ, फसवणूक किंवा इतर कोणत्याही प्रकारची गडबड आढळल्यास तातडीने तक्रार करण्याचे आवाहन GJC ने केले आहे. ग्राहक आणि सराफ व्यावसायिक GJC तसेच BIS कडे आपली तक्रार करु शकतात.
याशिवाय, ज्वेलर्सनी उत्पादक, घाऊक विक्रेते आणि पुरवठादारांकडून खरेदी केलेल्या सोन्याची योग्य प्रकारे गुणवत्ता तपासावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. ग्राहकांचा विश्वास आणि त्यांची सुरक्षितता यांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.
GJC ने ग्राहकांना सोने खरेदी करताना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
1. विश्वासार्ह ज्वेलर्सकडूनच सोने खरेदी करा : नेहमी प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह सराफ दुकानातूनच सोन्याचे दागिने खरेदी करा.
2. कमी मेकिंग चार्जच्या आमिषाला बळी पडू नका : कमी घडणावळ किंवा विशेष सवलतींच्या ऑफर पाहून घाईघाईने सोने खरेदी करू नका.
3. हॉलमार्किंग तपासून घ्या : दागिन्यांवरील हॉलमार्कची माहिती BIS Care अॅपवर तपासा. त्यामुळे दागिन्यांच्या शुद्धतेबाबत खात्री करता येईल.
4. पक्के बिल घेणे विसरू नका : सोने खरेदी केल्यानंतर GST नमूद असलेले पक्के बिल नक्की घ्या. बिलामध्ये दागिन्यांचे वजन, शुद्धता आणि इतर शुल्कांची माहिती तपासा.
5. भेसळीचा संशय आल्यास तक्रार करा : सोन्याच्या शुद्धतेबाबत किंवा वजनाबाबत शंका असल्यास संबंधित संस्था किंवा BIS कडे तक्रार करा.
GJC चे उपाध्यक्ष अविनाश गुप्ता यांनी सांगितले की, काही ठिकाणांहून आलेल्या बातम्या किंवा अफवांमुळे ज्वेलर उद्योगाबाबत चुकीचे चित्र निर्माण होऊ नये. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याऐवजी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच, सर्व ज्वेलर्सनी BIS च्या हॉलमार्किंग नियमांचे काटेकोर पालन करावे आणि सोन्याची गुणवत्ता तपासावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.