

Children Bank of India Fake Currency: गुजरातमध्ये बनावट नोटांच्या माध्यमातून ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या नोटांवर ‘Children Bank of India’ असे लिहिलेले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, बनावट नोटा पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील गांधीनगर येथील व्यावसायिक राकेश पटेल यांचे मामा रोहितकुमार पटेल यांचा उंझा येथे व्यवसाय आहे. त्यांना नागपूरमधील एका व्यावसायिकाकडून ४० लाख रुपये मिळणार होते.
मंगळवारी या व्यवहारांतर्गत व्यापाऱ्याच्या प्रतिनिधींना प्रत्येकी ५ लाख रुपये असल्याचे सांगून आठ बंडल देण्यात आले. मात्र, या नोटांची तपासणी केली असता त्या बनावट असल्याचे समोर आले. आठ बंडलमध्ये एकूण ४० लाख रुपये असल्याचे भासवून फसवणूक करण्यात आली होती.
या प्रकारानंतर तक्रारदाराच्या कुटुंबीयांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अहमदाबादमध्ये पुन्हा एकदा रोख रक्कम पोहोचवण्याचा व्यवहार ठरवण्यात आला. यावेळी तक्रारदाराच्या वडिलांना व्हॉट्सॲपवरून संपर्क साधण्यात आला. पैसे पोहोचल्याचे सांगून आरोपींनी अहमदाबादमधील पारसनगर पेट्रोल पंपावर भेटण्यास सांगितले.
ठरल्याप्रमाणे राहुल सिंह ठाकूर (वय २३, दिल्ली) आणि मलचंद शर्मा (वय ३०, राजस्थान) हे दोघे बॅगा घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचले. त्यांनी नोटांची बंडल दाखवण्यास सुरुवात करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तक्रारदाराच्या कुटुंबीयांच्या मदतीने घाटलोडिया पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी राहुल सिंह ठाकूर याच्याकडील बॅगेतून बनावट नोटांची १७ बंडले जप्त केली. या बंडलमध्ये एकूण १,६६६ बनावट नोटा होत्या. प्रत्येक बंडलमध्ये ५०० रुपयांच्या ९८ नोटा होत्या. मात्र, या नोटांवर ‘Children Bank of India’, ‘Bharatiya Manoranjan Bank’ आणि ‘Five Hundred Coupon’ असे शब्द छापलेले होते. तसेच नोटांची बंडले खरी वाटावीत यासाठी त्यावर आयसीआयसीआय बँकेच्या नावासारखी दिसणारी लेबल्स लावण्यात आली होती.
दिल्लीतील रेल्वे स्थानकावरून नोटांची बंडले घेतली
पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणातील आणखी काही नावे समोर आली आहेत. मलचंद शर्मा याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा नोएडामध्ये राहणारा भाऊ गजानन शर्मा याने त्याची धनराज नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली होती. धनराजने राहुल आणि मलचंद यांना दिल्लीतील रेल्वे स्थानकावर वरुण नावाच्या व्यक्तीकडून नोटांची बंडले घेण्यास सांगितले होते. त्यानंतर ही बंडले अहमदाबादमध्ये नरेंद्र पटेल यांच्याकडे पोहोचवण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.
या कामासाठी दोघांना प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या प्रकरणात राहुल सिंह ठाकूर, मलचंद शर्मा, गजानन शर्मा, धनराज आणि वरुण या पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून या संपूर्ण टोळीचा तपास सुरू आहे. या बनावट नोटांच्या व्यवहारामागे आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि अशा प्रकारे इतरांचीही फसवणूक करण्यात आली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.