China Gold Adulteration | सोन्यातील भेसळीचा चिनी धोका

China Gold Adulteration |
China Gold Adulteration | सोन्यातील भेसळीचा चिनी धोका
Published on: 
Updated on: 

सुचित्रा दिवाकर

चीनमधून येणाऱ्या रेनियम या दुर्मीळ धातूच्या भुकटीचा वापर सोन्यातील भेसळीसाठी केला जात आहे. सोन्याची शुद्धता तपासणाऱ्या यंत्रणांनाही ही भेसळ चकवा देऊ शकते.

सोन्याच्या किमतींनी उच्चांकी पातळी गाठली असताना आता सोन्याच्या शुद्धतेविषयी चिंता निर्माण करणारी एक नवी बाब समोर आली आहे. सोन्यामध्ये रेनियम नावाच्या दुर्मीळ धातूची भुकटी मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. भारतात ही भुकटी चीनमधून येत असल्याचे वृत्त आहे. या भेसळीची गंभीर बाब म्हणजे, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सराफांकडून वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक यंत्रांनाही रेनियमची भेसळ चकवा देऊ शकते. ऑगस्ट २०२५ मध्ये चीनच्या झेजियांग प्रांतातील पोलिसांनी अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या माध्यमातून या टोळीने सराफ आणि ग्राहकांची आठ लाख युआनची फसवणूक केल्याचे ‘द स्ट्रेट्स टाइम्स‌’ने म्हटले होते. भारतातही अशा प्रकारचे जाळे तयार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, यामागे संघटित चिनी टोळ्यांचा हात असल्याचे अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेले नाही.

भारतीय कुटुंबांकडे असलेल्या सोन्याचा विचार करता या प्रकाराचे गांभीर्य लक्षात येईल. आपल्याकडे सोन्याची खरेदी प्रामुख्याने दागिन्यांच्या स्वरूपात केली जाते. लग्नकार्य, सण-समारंभ आणि अन्य कौटुंबिक प्रसंगांच्या निमित्ताने खरेदी करण्यात आलेले सोने अनेक पिढ्यांपर्यंत जपून ठेवले जाते. आर्थिक संकटाच्या काळात याच सोन्याचा आधार घेतला जातो. बँका आणि बिगरबँकिंग वित्तीय संस्थांकडून सोन्याच्या तारणावर मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप केले जाते. त्यामुळे सोन्याच्या शुद्धतेचा प्रश्न हा सराफ आणि ग्राहकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचा संबंध देशातील वित्तीय व्यवहारांशीही आहे. नव्या प्रकारच्या भेसळीमुळे सोन्याचे मूल्यांकन करण्याच्या सध्याच्या व्यवस्थेतील त्रुटी प्रकर्षाने समोर आल्या आहेत.

रेनियम हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर अत्यंत कमी प्रमाणात आढळणारा धातू आहे. रेनियमच्या स्वतंत्र खाणी नसून तांबे आणि मॉलिब्डेनमच्या खनिजांवर प्रक्रिया करताना सहउत्पादनाच्या स्वरूपात तो मिळवला जातो. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण संस्थेच्या आकडेवारीचा हवाला देणाऱ्या वृत्तानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे ५० ते ६२ टन रेनियमचे उत्पादन होते. त्यापैकी जवळपास निम्मे उत्पादन एकट्या चिलीमध्ये होते. अमेरिका, पोलंड, चीन, उझबेकिस्तान, दक्षिण कोरिया आणि कझाकस्तान या देशांमध्येही रेनियमचे उत्पादन केले जाते. हा धातू वितळण्यासाठी सुमारे ३,१८० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. प्रचंड उष्णता आणि दाब सहन करण्याची क्षमता असल्यामुळे विमानांच्या जेट इंजिनमधील कलपुर्जे तयार करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पेट्रोलियम शुद्धीकरण, अंतराळ संशोधन आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठीही हा धातू महत्त्वाचा आहे. सोन्यामध्ये रेनियमची भेसळ करण्यामागे या दोन्ही धातूंच्या भौतिक गुणधर्मांमधील काही साम्य कारणीभूत आहे. सोन्याची घनता १९.३२ ग्रॅम प्रतिघन सेंटीमीटर आहे, तर रेनियमची घनता २१.०२ ग्रॅम प्रतिघन सेंटीमीटर आहे. त्यामुळे वजन आणि आकाराच्या आधारे भेसळ ओळखणे अवघड ठरू शकते. क्ष किरणांच्या सहाय्याने सोन्याची शुद्धता तपासणाऱ्या कॅरेटमीटरमध्येही काही परिस्थितींमध्ये चुकीचे निष्कर्ष मिळण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे कसोटीवर घासून अथवा आम्लाच्या सहाय्याने सोन्याची शुद्धता तपासण्याच्या पारंपरिक पद्धतींनाही मर्यादा आहेत. सोन्याच्या धातुवैज्ञानिक परीक्षणासाठी वापरण्यात येणारी अद्ययावत उपकरणे सर्वच सराफांकडे उपलब्ध असतील असे नाही. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना या परिस्थितीचा फायदा उठवता येऊ शकतो.

सोन्याच्या बाजारपेठेतील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक केला. प्रत्येक दागिन्याला स्वतंत्र सहा अंकी ओळख क्रमांक देण्याची व्यवस्था केली. भारतीय मानक ब्यूरोच्या माध्यमातून ग्राहकांना या क्रमांकाची पडताळणी करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली. यामुळे सोन्याच्या शुद्धतेबाबत ग्राहकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. परंतु बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून भेसळ केली जात असेल, तर शुद्धता तपासण्याच्या निकषांमध्येही बदल करावे लागतील. हॉलमार्क देण्याचा अधिकार असलेल्या केंद्रांमध्ये अशा प्रकारची भेसळ शोधण्याची व्यवस्था कितपत सक्षम आहे, याचा आढावा भारतीय मानक ब्यूरोने घेण्याची आवश्यकता आहे.

सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे भेसळ करणाऱ्यांना मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाणही वाढले आहे. सोन्याच्या एखाद्या दागिन्यामध्ये अगदी काही ग्रॅमची भेसळ करण्यात आली, तरी ग्राहकाचे हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते. सोन्याच्या पुनर्विक्रीच्या वेळी ही भेसळ उघडकीस आली, तर त्याचे आर्थिक नुकसान ग्राहकाला सोसावे लागेल. जुन्या सोन्याची खरेदी करणाऱ्या सराफांचीही अशाच प्रकारे फसवणूक होऊ शकते. एकदा भेसळयुक्त सोने बाजारपेठेत आले आणि त्यापासून नवीन दागिने तयार केले, तर मूळ भेसळ करणाऱ्यांचा शोध घेणे अधिक जिकिरीचे होईल. सोन्याच्या तारणावर कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांनीही या धोक्याची दखल घेणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये सुवर्णतारण कर्जाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आपल्या तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या कर्जाचा वापर करतात. सोन्याच्या शुद्धतेचे चुकीचे मूल्यांकन करून कर्जवाटप झाले आणि संबंधित कर्जाची परतफेड झाली नाही, तर वित्तीय संस्थांना नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे सुवर्णतारण कर्ज देताना वापरण्यात येणाऱ्या परीक्षण पद्धतींचाही फेरविचार करावा लागेल.

रेनियम हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा धातू असल्यामुळे त्याच्या आयातीवर सरसकट निर्बंध घालणे व्यवहार्य ठरणार नाही. भारताला संरक्षण उत्पादन, विमाननिर्मिती आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानाधारित उद्योगांसाठी अशा धातूंची आवश्यकता आहे. मात्र, औद्योगिक वापरासाठी आयात करण्यात आलेल्या रेनियमची विक्री कोणाला करण्यात येते, त्याचा अंतिम वापर कुठे होतो आणि अनधिकृत विक्रेत्यांच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाते का, यावर लक्ष ठेवण्याची व्यवस्था निर्माण करणे शक्य आहे. सीमाशुल्क विभाग, भारतीय मानक ब्यूरो आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण यंत्रणांनी यासंदर्भात समन्वयाने काम केले पाहिजे. रेनियमची भेसळ शोधण्यासाठी आयसीपी-ओईएस आणि आयसीपी-एमएस यांसारख्या प्रगत प्रयोगशाळा परीक्षण पद्धतींचा वापर करता येतो. अर्थात, या चाचण्यांसाठी विशेष उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि योग्य नमुना प्रक्रिया आवश्यक असते. प्रत्येक सराफाच्या दुकानात अशी सुविधा निर्माण करणे शक्य नसले, तरी प्रमुख सुवर्ण बाजारपेठांमध्ये अत्याधुनिक परीक्षण केंद्रे उभारता येऊ शकतात. ग्राहकांनीही सोन्याची खरेदी करताना अधिकृत हॉलमार्क, दागिन्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि खरेदीचे पक्के बिल याबाबत आग्रही राहिले पाहिजे.

सोन्याच्या व्यवहारांचा पाया विश्वासावर उभा आहे. हा विश्वास डळमळीत झाल्यास त्याची किंमत संपूर्ण सुवर्ण उद्योगाला मोजावी लागेल. भेसळ करणाऱ्यांचे तंत्रज्ञान विकसित होत असताना भेसळ शोधणारे तंत्रज्ञान कालबाह्य राहणे परवडणारे नाही. घोटाळ्याची व्याप्ती वाढल्यानंतर तपास यंत्रणांना कामाला लावण्यापेक्षा तो रोखण्यासाठी आताच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शहाणपणाचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.