

Petrol Diesel Price Hike: देशात लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठा बदल दिसू शकतो. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन दरांवर दबाव वाढत आहे. काही अहवालांनुसार, पेट्रोल ₹18 आणि डिझेल तब्बल ₹35 प्रति लिटरने महाग होऊ शकते.
सध्या देशातील तेल कंपन्या तोट्यात इंधन विकत आहेत. पेट्रोलवर सुमारे ₹18 आणि डिझेलवर ₹35 प्रति लिटर तोटा सहन करावा लागत आहे. एकूणच दररोज जवळपास ₹1,600 कोटींचं नुकसान कंपन्यांना होत असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी हा तोटा ₹2,400 कोटींपर्यंत गेला होता, मात्र केंद्राने एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर तो काहीसा कमी झाला.
भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 88% कच्चं तेल आयात करतो. त्यापैकी 45% तेल मध्यपूर्वेतून, तर 35% रशियातून येतं. त्यामुळे जागतिक बाजारातील किंमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. यामुळे देशाची चालू खात्यातील तुट (CAD) वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या पाच राज्यांतील निवडणुकांमुळे सरकारने दर स्थिर ठेवले आहेत. पण निवडणुका संपल्यानंतर दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर दर वाढले, तर महागाई वाढण्याची आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
डिझेल महाग झाल्यास ट्रान्सपोर्ट सेक्टरवर थेट परिणाम होणार आहे. आधीच काही ठिकाणी डिझेलचा पुरवठा मर्यादित असल्याच्या तक्रारी आहेत. ट्रक चालकांना वारंवार इंधन भरण्यासाठी थांबावं लागत आहे, ज्यामुळे डिलिव्हरी उशिरा होत आहे.
खासगी कंपन्यांनी आधीच दर वाढवले आहेत किंवा पुरवठा कमी केला आहे. त्यामुळे सरकारी पंपांवर अचानक मागणी वाढली आहे. काही ठिकाणी इंधन कमी पडत असल्याच्या तक्रारी आहेत.
सरकारने नागरिकांना घाबरून जास्त इंधन खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. सध्या देशभरात पुरवठा सुरळीत असल्याचंही स्पष्ट केलं आहे.
तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाची किंमत $95 प्रति बॅरलच्या आसपास राहिली, तर पेट्रोल-डिझेलच्या दरात ₹8 ते ₹15 पर्यंत वाढ होऊ शकते. ब्रेंट क्रूड जवळपास $96 प्रति बॅरल आहे, त्यामुळे दबाव कायम आहे.