

Gold vs Stock Market 2026: चालू वर्ष संपत आले असताना शेअर बाजाराने जरी उच्चांक गाठला असला, तरी गुंतवणूकदारांना अपेक्षेइतका परतावा मिळालेला नाही. टॅरिफचा फटका, रुपयाची घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांची (FPI) सातत्याने झालेली विक्री यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.
दुसरीकडे, सोने आणि चांदीच्या किमतींनी मात्र परताव्याच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले आहेत. वायदा बाजारात सोन्याने गुंतवणूकदारांना सुमारे 71 टक्के परतावा दिला आहे, तर चांदीने तब्बल 121 टक्के कमाई करून दिली आहे. वर्षअखेरीपर्यंत या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, 2026 मध्ये सोने, चांदी की शेअर बाजार कोण जास्त परतावा देणार? याबाबत देशातील आघाडीची ब्रोकरेज फर्म कोटक सिक्युरिटीजने अंदाज वर्तवला आहे.
सप्टेंबर 2024 मधील उच्चांकानंतर भारतीय शेअर बाजारात सुमारे 17 टक्क्यांची घसरण झाली होती. मात्र 2025 अखेरीस निफ्टी 50 ने पुन्हा एकदा नवा ‘ऑल टाइम हाय’ गाठला आहे. लार्ज-कॅप कंपन्यांचे शेअर्स तुलनेने चांगले कामगिरी करताना दिसले, तर मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्स घसरताना दिसले.
ऑटोमोबाईल, बँकिंग आणि मेटल क्षेत्राने चांगली कामगिरी केली, तर आयटी आणि FMCG क्षेत्रात अस्थिरता होती. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरू असतानाही देशांतर्गत गुंतवणूकदारांनी बाजाराला आधार दिला. त्यामुळे भारतीय इक्विटी मार्केटवरील विश्वास अधिक वाढला आहे. IPO आणि प्राथमिक बाजारही तेजीत होता.
आर्थिक वर्ष 2027 मध्ये निफ्टीच्या नफ्यात 17.6 टक्के, तर आर्थिक वर्ष 2028 मध्ये 14.8 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. डिसेंबर 2026 पर्यंत निफ्टी 29,120 अंकांपर्यंत पोहोचू शकतो. यामध्ये आर्थिक वर्ष 2028 साठी Earnings Per Share (EPS) 1,456 रुपये आणि Price-to-Earnings (P/E) रेशो 20 गृहित धरलेला आहे.
बुल केसमध्ये निफ्टी 32,032 अंकांपर्यंत जाऊ शकतो, तर बियर केसमध्ये तो 26,208 अंकांपर्यंत घसरू शकतो. 2026 साठी संभाव्य ‘हॉट सेक्टर्स’ म्हणून बँकिंग व वित्तीय सेवा (BFSI), टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांकडे पाहिले जात आहे.
2025 मध्ये सोन्याने दमदार कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 55 टक्क्यांहून अधिक वाढून 4,000 डॉलर प्रति औंसच्या पुढे गेली. जागतिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि सेंट्रल बँकांकडून मोठ्या प्रमाणात झालेली खरेदी ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
भारतात वायदा बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये आतापर्यंत सुमारे 71 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये रुपयाच्या घसरणीचाही मोठा वाटा आहे. चांदीने मात्र यंदा सोन्यालाही मागे टाकले असून वायदा बाजारात 121 टक्क्यांची झेप घेतली आहे. सेफ-हेवन मागणी, पुरवठ्यातील कमतरता यामुळे चांदीच्या किमती वाढल्या.
कोटक सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ श्रीपाल शाह यांनी सांगितले की, “जागतिक आव्हाने असतानाही भारत हा चांगल्या वाढीचे केंद्र राहिले आहे. कॉर्पोरेट कमाई चांगली राहण्याची अपेक्षा आणि अनुकूल धोरणात्मक वातावरणामुळे आम्ही भारतीय इक्विटीबाबत सकारात्मक आहोत.”
ते पुढे म्हणाले, “2026 मध्ये सोने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आपली चमक कायम ठेवेल. तरुण गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग बाजाराला अधिक बळ देईल आणि मार्केटमध्ये नव्या संधी निर्माण होतील.”
उद्योग क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सेबीच्या अलीकडील सर्वेक्षणानुसार 63 टक्के कुटुंबांना किमान एका सिक्युरिटी मार्केट प्रोडक्टची माहिती आहे, मात्र प्रत्यक्षात फक्त 9.5 टक्के कुटुंब गुंतवणूक करतात. यावरून भारतीय इक्विटी बाजारात अजूनही मोठ्या संधी असल्याचे दिसत आहे. ब्रोकरेज फर्म्सनी गुंतवणूक अधिक सोपी आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.