

SBI Reduces Home Loan Rates by 25 Bps: भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. SBI ने होम लोनसह विविध कर्जांवरील व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे.
या निर्णयाअंतर्गत SBI आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR), एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR), रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR), बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) आणि बेस रेटमध्ये कपात करणार आहे. हे नवे दर 15 डिसेंबर 2025 पासून लागू होतील.
या कपातीमुळे कर्जावरील व्याजदर सुमारे 0.25 टक्क्यांनी कमी होणार असून, त्यामुळे ग्राहकांची मासिक हप्त्याची (EMI) रक्कमही कमी होणार आहे. SBIच्या या निर्णयाचा फायदा लाखो किरकोळ आणि कॉर्पोरेट कर्जदारांना होणार आहे.
RBI ने अलीकडेच व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा रेपो रेट कमी केला असून, आता रेपो रेट 5.25 टक्के झाला आहे.
सध्या SBI होम लोनवर किमान 7.4 टक्के व्याज आकारते, तर पर्सनल लोनवर 9 ते 10 टक्के व्याज आकारले जाते. मात्र, नव्या निर्णयानंतर होम लोन आणि पर्सनल लोनवरील व्याजदर कमी होणार असून, ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.
जर तुम्ही EBLR आधारित 30 लाख रुपयांचे होम लोन 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले असेल आणि सध्या व्याजदर 8 टक्के असेल, तर तुमचा EMI सुमारे ₹25,093 आहे. आता 25 बेसिस पॉइंट्सची कपात झाल्यानंतर हा EMI कमी होऊन सुमारे ₹24,628 इतका होईल. म्हणजे तुमची दर महिन्याला बचत होणार आहे.