

PM Kisan Amount Double Update Government Response: PM किसान सन्मान निधी योजनेची वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 12,000 रुपयांपर्यंत वाढवली जाणार का? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. डिसेंबर 2024 मध्ये संसदेच्या एका स्थायी समितीने सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये देण्याची शिफारस केली होती. याच मुद्द्यावर 12 डिसेंबर 2025 रोजी राज्यसभेत खासदार समीरुल इस्लाम यांनी सरकारकडून स्पष्टीकरण मागितले.
कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रमणाथ ठाकूर यांनी या प्रश्नावर स्पष्ट उत्तर देत सांगितले की, सरकारच्या विचाराधीन असा कोणताही प्रस्ताव नाही. म्हणजेच PM किसान योजनेची वार्षिक रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही. या उत्तरामुळे शेतकऱ्यांमध्ये सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
खासदार इस्लाम यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की, PM किसानचा हप्ता मिळवण्यासाठी किसान ID अनिवार्य आहे का? यावर मंत्री ठाकूर यांनी सांगितले की:
किसान ID फक्त नव्या नोंदणीसाठी अनिवार्य आहे,
तेही अशा 14 राज्यांमध्ये, जिथे किसान रजिस्ट्री तयार करण्याचे काम सुरू आहे.
ज्या राज्यांत हे काम अद्याप सुरू झालेले नाही, तेथे किसान ID नसतानाही शेतकरी नोंदणी करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.
सरकारने अशा राज्यांतील शेतकऱ्यांचा डेटा देखील उपलब्ध करून दिला आहे, ज्यांनी अद्याप किसान ID तयार केलेली नाही.
PM किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून ती फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाली. या योजनेअंतर्गत:
शेतीयोग्य जमीन असलेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
ही रक्कम 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
थेट DBT मार्फत आधार-लिंक्ड खात्यावर ही रक्कम जमा होते.
सरकारच्या माहितीनुसार, योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 21 हप्त्यांद्वारे तब्बल 4.09 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे ही योजना देशातील सर्वात मोठ्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनांपैकी एक बनली आहे.
शेतकरी PM किसान योजनेची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन स्वतःचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे सहज तपासू शकतात. Farmers Corner → Beneficiary List. येथे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव भरल्यास पूर्ण यादी स्क्रीनवर दिसते.