

Elon Musk SpaceX Shares for American Children: प्रसिद्ध उद्योगपती आणि SpaceX चे संस्थापक एलन मस्क यांनी अमेरिकेतील प्रत्येक मुलाला कंपनीचे दोन शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, यातील एक शेअर SpaceX कंपनीकडून दिला जाणार आहे, तर दुसरा शेअर स्वतः एलन मस्क त्यांच्या वैयक्तिक मालकीतून देणार आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेतील लाखो मुलांना थेट कंपनीत भागीदार होण्याची संधी मिळू शकते.
या योजनेअंतर्गत कंपनीकडून प्रत्येक पात्र मुलाच्या ट्रम्प अकाउंटमध्ये SpaceX चा एक क्लास A कॉमन स्टॉक शेअर जमा केला जाणार आहे. त्याचवेळी एलन मस्कदेखील कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या शेअर्सइतकेच शेअर्स स्वतःच्या वैयक्तिक मालकीतून देणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पात्र मुलाला एकूण दोन शेअर्स मिळणार आहेत.
यापूर्वी SpaceX च्या अध्यक्षा ग्वेने शॉटवेल आणि त्यांचे पती यांनीही 'इन्व्हेस्ट अमेरिका' (Invest America) कार्यक्रमांतर्गत 20 लाखांहून अधिक मुलांच्या खात्यात शेअर्स देण्याची घोषणा केली होती. या मुलांचे वय 11 ते 17 वर्षे आहे. विशेषतः कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या भागांतील मुलांना या योजनेचा लाभ देण्यावर भर आहे. यामध्ये सेंट्रल टेक्सास परिसरातील मुलांचाही समावेश आहे.
एलन मस्क यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देण्याची घोषणा केली होती. आता कंपनीकडूनही एक शेअर दिला जाणार असल्याने मुलांना दोन शेअर्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भविष्यातील अर्थव्यवस्थेत सर्वसामान्य लोकांचाही वाटा असला पाहिजे, असे मस्क यांचे मत आहे. कंपनीचे शेअर्स थेट लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यासाठी योग्य मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले होते. शेअर्सच्या माध्यमातून मुलांनाही भविष्यात कंपनीच्या वाढीचा फायदा मिळू शकतो, असा या उपक्रमामागील हेतू आहे.
Space Exploration Technologies Corp म्हणजेच SpaceX चे शेअर्स 12 जून 2026 रोजी अमेरिकेतील नॅस्डॅक शेअर बाजारात लिस्ट झाले होते. 25 नोव्हेंबर रोजी कंपनीचा शेअर 1.30 टक्क्यांनी वाढून 127.44 डॉलरवर बंद झाला. मात्र, गेल्या पाच दिवसांत शेअरमध्ये 12.20 टक्के आणि एका महिन्यात 13.25 टक्क्यांची घसरण झाली आहे.