India Entrepreneurship: भारत जगात अव्वल! ८५ टक्के भारतीयांना व्हायचंय उद्योजक; Gen Z मध्ये सर्वाधिक क्रेझ, AIमुळे बदललं चित्र

India Entrepreneurship LinkedIn Report 2026: भारतातील तब्बल ८५ टक्के लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून, हे प्रमाण जागतिक सरासरीच्या जवळपास दुप्पट आहे.
India Entrepreneurship LinkedIn Report 2026
India Entrepreneurship LinkedIn Report 2026Pudhari
Published on: 
Updated on: 

India Entrepreneurship LinkedIn Report 2026: भारतामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे तरुणांचा कल वेगाने वाढत आहे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लिंक्डइनच्या नव्या संशोधनानुसार, भारतातील तब्बल ८५ टक्के लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. विशेष म्हणजे, हे प्रमाण जागतिक सरासरीच्या जवळपास दुप्पट आहे. जनरेशन झेड आणि मिलेनियल्स या तरुण पिढ्यांमध्ये उद्योजक होण्याची इच्छा सर्वाधिक असल्याचेही या संशोधनातून समोर आले आहे.

लिंक्डइनच्या आकडेवारीनुसार, २०२२ पासून आपल्या प्रोफाइलवर 'फाउंडर' म्हणजेच संस्थापक अशी ओळख जोडणाऱ्या सदस्यांच्या संख्येत १९० टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये जनरेशन झेड तरुणांची संख्या विशेष वेगाने वाढली असून, त्यांच्या संख्येत तब्बल ३८३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

तरुणांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा अधिक

लिंक्डइनच्या सर्वेक्षणानुसार, भारतातील ८५ टक्के लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. यामध्ये ९४ टक्के जनरेशन झेड आणि ९० टक्के मिलेनियल्सचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जनरेशन झेडमधील दहापैकी सात तरुणांनी पुढील तीन वर्षांत स्वतःचा व्यवसाय किंवा साईड बिझनेस सुरू करण्याची योजना आखली आहे.

महिला आणि पुरुषांमध्येही उद्योजकतेबाबत फारसा फरक दिसत नाही. सर्वेक्षणात ९१ टक्के महिलांनी, तर ९४ टक्के पुरुषांनी पुढील काही वर्षांत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ही इच्छा केवळ स्वप्नांपुरती मर्यादित राहिलेली नाही. प्रत्यक्षात अनेक जण व्यवसाय सुरू करत असल्याचे लिंक्डइनच्या आकडेवारीतून दिसते. २०२२ पासून लिंक्डइन प्रोफाइलवर 'फाउंडर' अशी ओळख जोडणाऱ्यांची संख्या १९० टक्क्यांनी वाढली आहे. सध्या लिंक्डइनवरील संस्थापकांमध्ये मिलेनियल्सचे प्रमाण सर्वाधिक असून, ते ४८ टक्के आहे.

एआय आणि सोशल मीडियामुळे व्यवसाय सुरू करणे झाले सोपे

पूर्वी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे भांडवल, कर्मचारी, कार्यालय आणि ग्राहक मिळवण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागत होता. मात्र, आता डिजिटल तंत्रज्ञानामुळे ही परिस्थिती बदलत आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या भारतातील ८६ टक्के लोकांच्या मते, पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या अधिक संधी उपलब्ध आहेत.

यामागे सोशल मीडिया आणि इंटरनेटचा मोठा वाटा आहे. ७४ टक्के लोकांच्या मते, सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. तर ६३ टक्के लोकांनी व्यावसायिक ज्ञान आणि माहिती सहज उपलब्ध होत असल्याचे सांगितले.

याशिवाय, ४२ टक्के लोकांच्या मते, लिंक्डइनसारख्या व्यावसायिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उद्योजकांना स्वतःची ओळख निर्माण करता येते. तसेच संभाव्य ग्राहक, भागीदार आणि इतर व्यावसायिक व्यक्तींशी संपर्क साधता येतो.

India Entrepreneurship LinkedIn Report 2026
Cab Driver Daily Income: कॅब ड्रायव्हरची कमाई ऐकून तरुण थक्क! दिवसाला २० हजार रुपये कमाई; मोठ्या कंपनीतील मॅनेजरपेक्षाही जास्त उत्पन्न

एआयमुळे कमी खर्चात व्यवसाय सुरू करण्याची संधी

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयमुळे व्यवसाय सुरू करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होत आहे. पूर्वी अनेक कामांसाठी स्वतंत्र कर्मचारी किंवा तज्ज्ञांची मदत घ्यावी लागत होती. आता एआयच्या मदतीने अनेक कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात करता येत आहेत.

लिंक्डइनच्या सर्वेक्षणानुसार, भारतातील दहापैकी नऊहून अधिक लघुउद्योजक आपल्या व्यवसायात एआयचा वापर करत आहेत.

एआय आणि डिजिटल साधनांमुळे व्यवसाय सुरू करणे किंवा चालवणे सोपे झाल्याचे अनेक संस्थापकांनी सांगितले. यापैकी ३६ टक्के संस्थापकांच्या मते, एआयमुळे त्यांना अशी उत्पादने किंवा सेवा ग्राहकांना देता येत आहेत, जी पूर्वी देणे शक्य नव्हते.

तर २३ टक्के संस्थापकांचे म्हणणे आहे की, एआयची मदत नसती तर व्यवसायासाठी त्यांना अधिक पैशांची गरज भासली असती.

यावर लिंक्डइन इंडियाचे कंट्री मॅनेजर कुमारेश पट्टाभिरामन म्हणाले की, भारतात उद्योजकतेच्या क्षेत्रात मोठा बदल होत आहे. व्यवसाय सुरू करणे हा आता नोकरी सोडून घेतलेला मोठा धोका राहिलेला नाही. अनेकांसाठी तो करिअरचा एक महत्त्वाचा पर्याय बनत आहे.

एआयमुळे व्यवसाय सुरू करण्याचा खर्च कमी होत असला, तरी एखाद्या कल्पनेचे यशस्वी व्यवसायात रूपांतर करण्यासाठी योग्य लोकांशी संबंध, चांगली टीम आणि ग्राहकांचा विश्वास महत्त्वाचा असतो. त्यामुळे व्यवसाय वाढवण्यासाठी व्यावसायिक संपर्क आणि विश्वासार्हता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एआयच्या काळात व्यावसायिक संपर्कांचे महत्त्व वाढले

एआयचा वापर वाढत असला, तरी व्यवसायाच्या यशासाठी माणसांशी असलेले संबंध महत्त्वाचा ठरत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८८ टक्के लघुउद्योजकांच्या मते, भविष्यात त्यांच्या व्यवसायात एआयचा वापर वाढेल. त्याचबरोबर व्यावसायिक संपर्कांचे महत्त्वही वाढणार आहे.

व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेताना संस्थापक केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहत नाहीत. ४१ टक्के संस्थापक निर्णय घेण्यासाठी आपल्या व्यावसायिक संपर्कांची मदत घेतात. तर ३९ टक्के जण तज्ज्ञांचा सल्ला घेतात आणि ३८ टक्के जण एआय साधनांचा वापर करतात.

व्यवसायात विश्वास निर्माण करण्यासाठी स्वतःची ओळख तयार करणेही महत्त्वाचे झाले आहे. सर्वेक्षणातील ८० टक्के संस्थापकांनी सांगितले की, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी त्यांना स्वतःच्या नावाने माहिती आणि कंटेंट शेअर करावा लागतो. तर ८८ टक्के संस्थापक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी स्वतःचा पर्सनल ब्रँड तयार करत आहेत.

India Entrepreneurship LinkedIn Report 2026
Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात पुन्हा घसरण; चांदीही 7 हजारांनी स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील आजचा दर

एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अनेक मार्ग

आजच्या काळात उद्योजकता केवळ एक व्यवसाय सुरू करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. अनेक जण एकाच वेळी वेगवेगळे व्यवसाय, साईड प्रोजेक्ट्स आणि उत्पन्नाचे इतर मार्ग शोधत आहेत.

लिंक्डइनच्या सर्वेक्षणानुसार, भारतातील ७५ टक्के लघुउद्योजकांकडे उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत आहेत. स्वतःच्या आवडीनुसार काम करता येणे हे उद्योजकतेकडे वळण्याचे सर्वात मोठे कारण असल्याचे दिसते. सर्वेक्षणात ५६ टक्के लोकांनी स्वतःच्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य हे प्रमुख कारण सांगितले.

तर ५२ टक्के लोकांना अधिक कमाईची संधी आकर्षित करते. ४९ टक्के लोकांना कामावर अधिक नियंत्रण आणि लवचिकता हवी आहे. याशिवाय, ४१ टक्के लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहेत.

व्यवसाय वाढवण्यासाठी लिंक्डइनने सांगितले पाच मार्ग

लघुउद्योजकांना ग्राहक मिळवणे, व्यावसायिक संपर्क वाढवणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे सोपे व्हावे यासाठी लिंक्डइनने पाच उपाय सुचवले आहेत.

१. प्रोफाइलवर कामाचा अनुभव दाखवा : तुम्ही एकापेक्षा जास्त व्यवसाय किंवा कामे करत असाल, तर लिंक्डइन प्रोफाइलवर अनुभव दाखवतो येतो. त्यामुळे तुमचे काम आणि अनुभव लोकांना समजण्यास मदत होते.

२. व्यावसायिक संपर्क वाढवा : नवीन लोकांशी झालेल्या ओळखीचे चांगल्या व्यावसायिक संबंधांमध्ये रूपांतर करा. लिंक्डइनच्या बिझनेस कार्ड आणि प्रायव्हेट कनेक्शन नोट्ससारख्या सुविधांचा वापर करून संपर्क अधिक मजबूत करता येतात.

३. तुमच्या कौशल्यातून कमाई करा : तुमच्याकडे एखाद्या विषयाचे चांगले ज्ञान असेल, तर लिंक्डइनच्या अॅडव्हाइस सेशन्सच्या माध्यमातून सशुल्क सल्ला देता येतो. यामुळे तुमच्या कौशल्याचा वापर करून उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण होते.

४. व्यवसायाची ऑनलाइन ओळख तयार करा: लिंक्डइन कंपनी पेजच्या माध्यमातून व्यवसायाची माहिती, ग्राहकांचे अभिप्राय आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी दाखवता येतात. यामुळे नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

५. व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य साधनांचा वापर करा : व्यवसाय वाढत असताना ग्राहक शोधणे, नवीन लोकांपर्यंत पोहोचणे आणि कर्मचारी भरती करणे अशा अनेक जबाबदाऱ्या वाढतात. अशा वेळी लिंक्डइनच्या प्रीमियम सुविधांचा वापर करून ही कामे अधिक सोपी करता येतात.

भारतात उद्योजकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. नोकरी हाच करिअरचा एकमेव मार्ग नसून स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, साईड बिझनेस उभारणे आणि एकापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्रोत तयार करणे याकडे तरुणांचा कल वाढत आहे. एआय, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे व्यवसाय सुरू करण्याच्या संधी वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतात नव्या उद्योजकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.