

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने बुधवारी (दि.१०) विक्रमी उच्चांकावर खुले झाल्यानंतर यू-टर्न घेतला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी घसरून ८०,२०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २४,४६१ च्या विक्रमी उच्चांकावर खुला झाला. पण निफ्टी विक्रमी उच्चांकावर जाऊनही सपाट पातळीवर व्यवहार करत आहे. विशेषतः एम अँड एम आणि बँकिंग शेअर्समधील घसरणीमुळे काही प्रमाणात दबाव दिसून येत आहे. सकारात्मक जागतिक संकेत असूनही आज भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक काही प्रमाणात घसरले आहेत. (Stock Market Updates)
सेन्सेक्स मंगळवारी ८०,४८१ वर खुला झाला. पण त्यानंतर तो ८०,२०० च्या खाली घसरला. सेन्सेक्सवर एम अँड एम, कोटक बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले आहेत. तर मारुती, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी हे शेअर्स तेजीत आहेत.
निफ्टीवर आज २४,४६१ च्या नव्या उच्चांकावर खुला झाला. निफ्टीवर मारुती, आयशर मोटर्स, एनटीपीसी, ब्रिटानिया हे शेअर्स तेजीत आहेत. तर एम अँड एम, एसबीआय, कोटक बँक, एचसीएल टेक हे शेअर्स घसरले आहेत. बँक निफ्टीही घसरला आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदर कधी होणार? याबाबत कोणतेही संकेत दिले नसल्याने बाजारात घसरण दिसून येत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.