म्युच्युअल फंड केवायसी नियमात बदल, जाणून घ्या अधिक | पुढारी

म्युच्युअल फंड केवायसी नियमात बदल, जाणून घ्या अधिक

जगदीश काळे

आपण म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Funds) गुंतवणूक करत असाल, तर केवायसी अचूक असणे अपेक्षित आहे. अन्यथा गुंतवणुकीचा अर्ज नाकारला जाईल किंवा म्युच्युअल फंडमधून पैसा काढणे कठीण राहू शकते. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक करताना केवायसीच्या नियमात बदल काय झाले आणि या बदलाचा सामान्य गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल, हे जाणून घेऊ.

गुंतवणुकीतील फसवणूक रोखण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी नियमात बदल केले गेले आहेत. या बदलामुळे एकीकडे गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्याचा विचार केला जात असताना काही वेळा अडचणीदेखील निर्माण होतात. अलीकडेच सेबीने म्युच्युअल फंडच्या (Mutual Funds) केवायसीशी संबंधित नियमांत काही बदल केले असून, ते लागू झाले आहेत. या बदलामुळे हजारो गुंतवणूकदारांना अडचणी आल्या.

अर्ज आणि पॅनवरील नाव वेगळे नसावे

गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सेबीने नियमांत बदल केले आहेत. यानुसार म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Funds) गुंतवणूक करण्यासाठी अर्ज करताना पॅन आणि अर्जावरचे नाव सारखेच असायला हवे. दोन्ही नावांत फरक असेल, तर अर्ज नाकारला जाईल. उदा. एखाद्या व्यक्तीचे नाव उमेशकुमार यादव आहे आणि पॅनवर हेच नाव यू. के. यादव असेल, तर ते नाव पॅनवरील नावाशी मिळतेजुळते राहणार नाही. अशा वेळी अर्ज नामंजूर केला जाईल.

नावाची पडताळणी कशी होते

नाव साधर्म्य पाहण्यासाठी आरटीए म्हणजेच रजिस्ट्रार अँड ट्रान्सफरमार्फत तो अर्ज पॅन क्रमांक जारी करणार्‍या संस्थांना पाठविला जातो. तपास संस्था अर्जावरचा पॅन नंबर हा अर्जदाराकडे आहे की नाही, याची खातरजमा करतात. त्यानंतर अर्जदाराचे नाव हे पॅनवरील नावासारखेच आहे की नाही, याची तपासणी करतात. दोन्हीत फरक असेल, तर आरटीएकडून त्याची माहिती फंड हाऊसला दिली जाते. फंड हाऊस अर्जदाराकडून नवा अर्ज सादर करण्याची विनंती करते आणि त्यात बराच वेळ जातो.

नाव व्हॅलिडेट असले तरी विलंब

एखाद्या व्यक्तीचे नाव फंड हाऊस व्हॅलिड करत असेल आणि तो दुसर्‍या फंड हाऊसमध्ये नव्याने गुंतवणूक करत असेल, तर त्याला पुन्हा नावाची पडताळणी करावी लागते. सध्या नावाची पडताळणी करणार्‍या संस्थांची संख्या एकापेक्षा अधिक आहे. दोन्ही फंड हाऊससाठी नावाची पडताळणी करणारी एकच संस्था असेल तर अडचण येत नाही. मात्र, दोन्ही फंड हाऊस वेगवेगळ्या संस्थांची सेवा घेत असतील, तर काही अडचणी येऊ शकतात.

पूर्वीची व्यवस्था

नवा नियम येण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचे पॅनवरील नाव यूके यादव असेल आणि अर्जावर उमेशकुमार यादव लिहिले असेल, तर म्युच्युअल फंड हाऊस कंपन्या त्याची तपासणी करून अर्ज पडताळणी करत मंजूर करत असत. मात्र, नव्या नियमामुळे अशा व्यक्ती अडचणीत आल्या आहेत. पॅनवरचे अर्धवट नाव त्यांना गोत्यात आणणारे ठरत आहे. एवढेच नाही, तर महिलेचे विवाहानंतर नाव बदलते. विवाहापूर्वी गुंतवणूक सुरू केली असेल आणि त्यानंतर तिचे नाव बदलत असेल, तर अशा वेळी गुंतवणुकीतून पैसे काढताना अडचण येते. त्यामुळे पॅनवरील नाव बदलून घ्यावे लागेल आणि दोन्हींच्या नावात साधर्म्य आढळल्यावर फंड हाऊस कंपन्या पैसे काढण्याची परवानगी देईल.

जुन्या गुंतवणूकदारांवर परिणाम नाही

नवीन नियमांचा परिणाम जुन्या गुंतवणूकदारांवर होणार नाही. यामागचे कारण म्हणजे जुन्या गुंतवणूकदारांनी आरटीए व्यवस्थेंतर्गत अगोदरच आपले नाव व्हॅलिडेट केलेले असते. त्यामुळे त्यांना पुन्हा केवायसीची गरज भासणार नाही. आता नवीन गुंतवणूकदारांना आपले नाव नवीन व्यवस्थेनुसार नोंदवावे लागणार आहे. यासाठी काही वेळ लागू शकतो.

हेही वाचा : 

Back to top button