

पुढारी ऑनलाईन : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात ठोस काही घोषणा नव्हत्या. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज चढ-उतार दिसून आला. मुख्यतः आजच्या सत्रात बाजारात अस्थिर वातावरण राहिले. विशेषतः बजेटनंतर रेल्वे, एनर्जी आणि फायनान्स स्टॉक्समध्ये ॲक्शन दिसून आली. सेन्सेक्स आज १०६ अंकांच्या घसरणीसह ७१,६४५ वर बंद ला. तर निफ्टी २८ अंकांनी घसरून २१,६९७ वर स्थिरावला. बीएसई मिडकॅप ०.४ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप ०२. टक्क्यांनी घसरला. (Stock Market Closing Bell)
सेन्सेक्स आज ७१,९९८ वर खुला झाला होता. सुरुवातीच्या व्यवहारात तो ७२,१५१ पर्यंत वाढला. पण त्यानंतर तो ७१,६०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, एलटी, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, विप्रो हे शेअर्स घसरले. तर मारुतीचा शेअर्स ४ टक्क्यांनी वाढून टॉप गेनर राहिला. त्याचबरोबर पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, एसबीआय हे शेअर्सही वाढले.
निफ्टीवर ग्रासीम, अल्ट्राटेक सिमेंट, एलटी, डॉ. रेड्डीज, टायटन हे शेअर्स घसरले. मारुती, सिप्ला, पॉवर ग्रिड, आयशर मोटर्स, एसबीआय लाईफ हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. (Stock Market Closing Bell)
अर्थमंत्री सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर केल्यानंतर बँकिंग स्टॉक्स तेजीत आले. विशेषतः PSU बँक शेअर्सचा वाढीला सपोर्ट मिळाला. बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, UCO बँक आणि कॅनरा बँक हे शेअर्स ३ टक्क्यांपर्यंत वाढले.
रूफटॉप सोलरायझेशनद्वारे १ कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितल्यानंतर आयआरईडीए (IREDA), KPI Energy आणि Websol Energy या ग्रीन एनर्जी आणि संबंधित शेअर्स ७ टक्क्यांपर्यंत वाढले.
पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडला गुरुवारच्या व्यवहारात मोठा फटका बसला. हा शेअर्स २० टक्क्यांनी घसरून ६०९ रुपयांवर आला. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन क्रेडिट आणि डिपॉझिट ऑपरेशन्स, टॉप-अप्स, फंड ट्रान्सफर आणि इतर बँकिंग ऑपरेशन्स फेब्रुवारी अखेरीस थांबवण्यास सांगितल्यानंतर वन ९७ कम्युनिकेशन्सचे शेअर्स २० टक्क्यांच्या घसरणीसह लोअर सर्किटमध्ये गेले.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीने बुधवारी व्याजदर ५.२५-५.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यूएस फेडने सलग चौथ्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की मार्चच्या सुरुवातीला व्याजदरात कपात होण्याची शक्यता नाही. पण त्यांनी हेदेखील कबूल केले की पतधोरण समितीतील प्रत्येकाचा यावर्षी कपात करण्याकडे कल दिसत आहे. "महागाई अजूनही खूप जास्त आहे. ती कमी होईल की नाही याबाबत निश्चित काही सांगू शकत नाही," असे पॉवेल यांनी फेडच्या पतधोरण-निर्धारण समितीने बेंचमार्क ५.२५-५.५० टक्क्यांच्या श्रेणीत व्याजदर ठेवल्यानंतर आणि व्याजदर कपात योग्य होणार नाही असे जाहीर केल्यानंतर सांगितले.
फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याचे संकेत दिल्यानंतर गुंतवणूकदारांची निराशा झाली. परिणामी बुधवारी अमेरिकेतील बाजारात घसरण झाली. फेडच्या निर्णयानंतर अमेरिकेसह आशियाई बाजारातही घसरण दिसून आली. एमएससीआयचा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक ०.३ टक्क्यांनी घसरला. जपानचा निक्केई ०.७ टक्क्यांनी कमी झाला, तर दक्षिण कोरियाच्या कोस्पीने ०.७ टक्क्याने उसळी घेतली. कारण १९ महिन्यांत प्रथमच कारखान्यांची उलाढाल वाढत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. चिनीचा ब्लू चिप्स ०.४ टक्क्यांनी खाली आला.
हे ही वाचा :