पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजार आज गुरुवारी (दि.२) वधारला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५२५ अंकांनी वाढून ६४,१०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० (Nifty) निर्देशांक १५५ अंकांच्या वाढीसह १९,१४४ वर गेला. सर्व क्षेत्रात चौफेर खरेदी दिसून येत आहे. एकूणच फेडच्या निर्णयाचे बाजाराने जोरदार स्वागत केले आहे. (Stock Market Updates)
संबंधित बातम्या
फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदर ५.२५ टक्के- ५.५० टक्क्यांच्या श्रेणीत आहे तसा कायम ठेवला आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, महागाई कमी होत आहे आणि पुढील दरवाढीवर विचार केला जात आहे.
सेन्सेक्स (Sensex Today) आज ६४,०३३ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६४,२०२ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, एसबीआय, कोटक बँक, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, टायटन, इन्फोसिस, एनटीपीसी, टीसीएस हे शेअर्स वाढले. तर टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया हे शेअर्स काही प्रमाणात घसरले आहे. (Stock Market Updates)
आशियाई बाजारातही आज तेजी राहिली. सुरुवातीच्या व्यवहारात जपानचा निक्केई १.४ टक्क्यांनी वाढला. दोन आठवड्यात पहिल्यांदाच या निर्देशांकाने पहिल्यांदाच ३२ हजारांचा टप्पा पार केला. चीनचा ब्लू चिप्स आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांकही वधारले आहेत.
यूएस फेडरल रिझर्व्हने बेंचमार्क व्याजदर आहे तसाच ठेवल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात गुरुवारी १ टक्क्याहून अधिक वाढ झाली.