Stock Market Updates | बाजारात सलग तिसऱ्या दिवशी विक्रीचा मारा! ६ लाख कोटींचा चुराडा, घसरणीची 'ही' आहेत ५ कारणे

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बेंचमार्क व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही आणि व्याजदर दीर्घकाळ उच्च राहण्याचे संकेत दिल्याचे पडसाद आज भारतीय बाजारात उमटले. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रांत भारतीय बाजारात घसरण कायम राहिली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ६५० अंकांनी घसरून ६६,१५० वर आला. तर निफ्टी १७३ अंकांच्या घसरणीसह १९,७२८ पर्यंत खाली घसरला. (Stock Market Updates) त्यानंतर सेन्सेक्स ५७० अंकांनी घसरणीसह ६६,२३० वर बंद झाला. तर निफ्टी १५९ अंकांच्या घसरणीसह १९,७४२ वर स्थिरावला. आजच्या सत्रातील सेन्सेक्सची घसरण ही ०.८५ टक्के एवढी आहे. तर निफ्टी ०.८० टक्क्यांनी खाली आला.
सोमवारी सेन्सेक्स २४२ अंकांनी, बुधवारी ७९६ अंकांनी आणि आज गुरुवारी सेन्सेक्स ६५० अंकांनी घसरला. गणेश चतुर्थीमुळे मंगळवारी बाजार बंद होता. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने सुमारे १६०० अंक गमावले आहेत. तर १५ सप्टेंबर रोजी २०,२०० जवळ गेलेला निफ्टी आता १९,८०० च्या खाली घसरला. यामुळे गेल्या तीन दिवसांत गुंतवणूकदारांचे सुमारे ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३१७ लाख कोटी रुपयांवर आले आहे. जे गेल्या शुक्रवारी ३२३ लाख कोटी रुपये होते.
संबंधित बातम्या
- Sensex crash | रेड अलर्ट! सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना २.२५ लाख कोटींचा झटका
- एक देश, एक विमा
आज सेन्सेक्स ६६,६०८ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६,१३७ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर वगळता इतर सर्व शेअर्स लाल चिन्हात बंद झाले. एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. सर्व क्षेत्रीय निर्देशांक ३ टक्क्यांपर्यंत खाली आले. सार्वजनिक आणि खासगी बँका, ऑटो आणि फार्मा या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसला.
निफ्टी ५० आज १९,८४० वर खुला झाला होता. त्यानंतर तो १९,७३८ पर्यंत खाली आला. निफ्टीवर एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस आणि ग्रासीम हे टॉप लूजर्स राहिले. तर अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा, यूपीएल हे वाढले. (Stock Market Updates)
हेवीवेट स्टॉक्समध्ये विक्री
जागतिक तसेच देशांतर्गत कमकुवत संकेतांदरम्यान शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. आज सुरुवातीला खासगी बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. कालच्या प्रमाणे आजही बाजारात हेवीवेट स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली.
फेडरल रिझर्व्हचा निर्णय
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने दोन दिवसांच्या बैठकीनंतर व्याजदराचा निर्णय जाहीर केला आणि बेंचमार्क व्याजदर ५.२५ टक्के – ५.५० टक्के एवढा जैसे थे ठेवला आहे. त्यात कोणताही बदल केलला नाही. या निर्णयानंतर भारतासह आशियाई बाजारात घसरण झाली.
आशियाई बाजार
आशियाई बाजारातही आज घसरण दिसून आली. जपानचा निक्केई १.२६ टक्के, दक्षिण कोरियाचा कोस्पी १.५१ टक्के, हाँगकाँगचा हँग सेंग १.३२ टक्के आणि शांघाय कंपोझिट ०.४७ टक्क्यांनी घसरला.
कच्च्या तेलाचे दर
कच्च्या तेलाचे दर आता सुमारे प्रति बॅरल ९० डॉलरच्या पातळीवर आहे. त्यात जूनपासून ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हिवाळ्यात तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलर पर्यंत वाढू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास यामुळे महागाईच्या तीव्र झळा बसू शकतात.
परदेशी गुंतवणूकदार
गेल्या अनेक महिन्यांच्या जोरदार खरेदीनंतर आता परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPIs) देशांतर्गत बाजारात विक्रीचा मारा सुरु आहे. त्यांनी या महिन्यात आतापर्यंत ५,२१३ कोटी रुपयांच्या देशांतर्गत शेअर्सची विक्री केली आहे.
हे ही वाचा :