Stock Market Updates | हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे गुंतवणूकदारांचे उडाले १४ लाख कोटी, जाणून घ्या आज बाजारात काय घडलं? | पुढारी

Stock Market Updates | हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे गुंतवणूकदारांचे उडाले १४ लाख कोटी, जाणून घ्या आज बाजारात काय घडलं?

Stock Market Updates : जागतिक संकेत संमिश्र आहेत. पण भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात हिंडेनबर्ग इफेक्ट (Hindenburg Research report) दिसून आला. आज दिवसभर शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. आज सोमवारी (दि.३०) शेअर बाजारातील सेन्सेक्स ५०० अंकांच्या घसरणीसह खुला झाला होता. तर निफ्टी १७,५०० च्या खाली आला होता. त्यानंतर काही वेळातच दोन्ही निर्देशांक सावरले आणि त्यांनी स्थिर पातळीवर व्यवहार केला. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स ११५ च्या वाढीसह ५९,४४६ वर तर निफ्टी १७,६०० वर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स १६९ अंकांनी वाढून ५९,५०० वर बंद झाला. तर निफ्टी १७,६४८ वर स्थिरावला.

सेन्सेक्सने गमावले २,२०० अंक

द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, अदानींविरोधातील हिंडेनबर्ग रिसर्चच्या ३२ हजार शब्दांच्या अहवालानंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना गेल्या तीन सत्रांत १३.८ लाख कोटींचा फटका बसला. यात सर्वाधिक नुकसान बँकिंग स्टॉक्सचे झाले आहे. तीन सत्रांत सेन्सेक्सने सुमारे २,२०० अंक गमावले आहेत. या घसरणीमुळे बीएसई सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (market capitalisation) २६६.६ लाख कोटींपर्यंत खाली आले आहे. या कालावधीत अदानी समूहातील शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिल्याने एकूणच शेअर बाजारातील कामगिरीवर त्याचा परिणाम झाला.

निफ्टी ३ महिन्यांच्या निचांकी पातळीवर

अदानी समूह (Adani Group) गेल्या अनेक वर्षापासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉड करत असल्याचा दावा अमेरिकेतील शॉर्ट- सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने त्यांच्या अहवालातून केला होता. यामुळे अदानींचे शेअर्स धडाधड कोसळत आहेत. निफ्टीही ३ महिन्यांच्या निचांकी पातळीवर आला आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा जोर कायम

अदानी कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गेल्या दोन सत्रांमध्ये ८३.७२ अब्ज रुपयांची (१.०३ अब्ज डॉलर) शेअर्सची विक्री केली आहे. तसेच निफ्टी बँक ३ हजार अंकांनी म्हणजेच ७.२ टक्क्यांपेक्षा खाली आला आहे.

अदानी स्टॉक्सला ५ लाख कोटींचा फटका

अदानी ट्रान्समिशन शेअर १९ टक्क्यांनी घसरून १,६२५ रुपयांवर ५२ आठवड्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला आहे. तर अदानी ग्रीनदेखील १९ टक्क्यांनी घसरून १,२०२ रुपयांवर पोहोचला. या घसरणीमुळे अवघ्या तीन ट्रेडिंग सत्रांच्या कालावधीत अदानी स्टॉक्सचे एकूण बाजार भांडवल ५.१७ लाख कोटींनी कमी झाले आहे. तर सोमवारच्या सत्रात अदानी शेअर्सच्या गुंतवणूकदारांचे १ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. दुपारच्या सत्रात अदानी समूहातील १० पैकी केवळ अदानी एंटरप्रायझेस या एकमेव शेअरने हिरव्या रंगात व्यवहार केला.

दरम्यान, अदानी समुहाने हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालावर ४१३ पानी निवेदनातून उत्तर दिले आहे. आम्ही सर्व कायद्यांचे पालन केले आहे. आम्ही जे काही व्यवहार केले आहेत ते भारतीय कायदे आणि अकाउंटिंग स्टॅडर्ड्सला धरुन आहेत, असा दावा अदानी समुहाने केला आहे. हिंडेनबर्गचा अहवाल हा भारत आणि त्याच्या स्वतंत्र संस्थांवर हल्ला असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे. ‘हा केवळ एका विशिष्ट कंपनीवर केलेला हल्ला नसून भारत आणि त्यांच्या संस्थांची गुणवत्ता, प्रामाणिकता तसेच स्वातंत्र्यासोबत महत्वाकांक्षा आणि त्याच्या विकासावर केलेला नियोजित हल्ला आहे.’ असे नमूद करण्यात आले आहे.

बँकिंग स्टॉक्सचे सर्वाधिक नुकसान

आजच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि एनटीपीसी यांचे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय लाइफ, पॉवर ग्रिड, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक टॉप लूजर्स होते. बँकिंगमध्ये इंडसइंड बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ॲक्सिस बँक, आरबीएल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचे शेअर्स घसरले. एकूण बँक निफ्टी सुमारे २ टक्क्यांनी खाली आला.

व्याजदर निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

जगभरातील गुंतवणूकदार अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणाव्यतिरिक्त या आठवड्याच्या शेवटी युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंड सारख्या इतर जागतिक मध्यवर्ती बँकांकडून होणाऱ्या व्याजदर निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे.

आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार

अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक गेल्या शुक्रवारी हिरव्या रंगात बंद झाले होते. सोमवारी आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार झाले. चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक २४.०३ अंक म्हणजेच ०.७३ टक्के वाढून ३,२८८ वर, जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ८६ अंकांनी वाढून २७,४६९ वर पोहोचला. तर हाँगकाँगच्या हँग सेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांकांत घसरण झाली आहे. (Stock Market Updates)

 हे ही वाचा :

Back to top button