Stock Market Crash | शेअर बाजारात हिंडेनबर्ग इफेक्ट? सेन्सेक्स १,१०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

Stock Market Crash : जागतिक नकारात्मक संकेत, परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा तसेच बँकिंग आणि अदानी शेअर्संमधील मोठ्या घसरणीचा फटका शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराला बसला. आज दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स तब्बल १,१२७ अंकांनी घसरला. त्यानंतर सेन्सेक्स ८७४ अंकांच्या घसरणीसह ५९,३३० वर बंद झाला. तर निफ्टी २८७ अंकांनी घसरून १७,६०४ वर स्थिरावला. अमेरिकन फर्म असलेल्या हिंडेनबर्ग (Hindenburg) रिसर्चच्या अहवालानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स धडाधड कोसळत आहे. आजच्या व्यवहारातही अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. शेअर बाजारातील आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ८.१ लाख कोटींचा फटका बसला. यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट होऊन ते २,६८,३४४ लाख कोटींवर आले.

आजच्या घसरणीत बँकिंग शेअर्संना सर्वाधिक फटका बसला. बँक निफ्टीची १ हजार अंक म्हणजेच २.५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. गेल्या काही महिन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या PSU बँक शेअर्संनाही फटका बसला आहे. सात सूचीबद्ध अदानी कंपन्यांचे शेअर्स दिवसभरात २ टक्के आणि १७ टक्क्यांच्या दरम्यान घसरले. तर अदानी टोटल गॅसचे शेअर्स २० टक्क्यांपर्यंत खाली आले.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल ७५० अंकांनी घसरून ६० हजारांखाली आला होता. तर निफ्टी १७,७०० पातळीवर व्यवहार करत होता. त्यानुसार दुपारी १२ च्या सुमारास सेन्सेक्सने ८०० हून अधिक अंकांनी घसरून व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्सची घसरण १,१०० अंकापर्यंत वाढतच गेली.

'हे' शेअर्स घसरले

सेन्सेक्सवर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स सर्वाधिक २ टक्क्यांपर्यंत घसरले. ॲक्सिस बँक, एसबीआय, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, कोटक बँक आणि पॉवर ग्रिड हे देखील घसरले. टाटा मोटर्स, एम अँड एम, आयटीसी, टाटा स्टील, मारुती आणि सन फार्मा यांचे शेअर्स ‍वधारले. अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक गुरुवारी वधारुन बंद झाले होते. यामुळे शुक्रवारी आशियाई बाजारात तेजी दिसून आली. पण भारतीय शेअर बाजारात हाहाकार उडाला.

हिंडेनबर्ग इफेक्ट, अदानींच्या शेअर्समध्ये घसरण कायम

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानींविरोधातील रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या १० शेअर्समध्ये घसरण सुरुच आहे. अदानी टोटल गॅसचे शेअर्स २० टक्क्यांपर्यंत खाली आले. अदानी पॉवर, अदानी विल्मर आणि एनडीटीव्हीचे शेअर ५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. अमेरिकेतील शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) नकारात्मक अहवालामुळे अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये घसरण कायम आहे. त्यामुळे भारत आणि आशियातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना ४५ हजार कोटींचा फटका बसला.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अदानी यांची संपत्ती ११३ अब्ज डॉलरवर आली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी ग्रुपमध्ये सर्व काही ठीक नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हा ग्रूप अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे. मात्र, अदानी ग्रुपने हा अहवाल खोटा असून एफपीओ आधी आपणास बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा दावा करण्यात आहे.

बँकिग शेअर्सवर दबाव

हिंडेनबर्ग रिपोर्टचा फटका बँकिंग शेअर्संनाही बसला आहे. पीएसयू बँक शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, महाराष्ट्र बँक यांचे शेअर्स प्रत्येकी ४ टक्क्यांनी घसरले.

FII कडून विक्रीचा सपाटा कायम

परदेशी संस्थागत गुंतवणूकदार अर्थात FII कडून भारतीय बाजारात या महिन्यात विक्रीचा जोर कायम आहे. NSDL डेटानुसार, जानेवारीत परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत बाजारातून १६,७६६ कोटी रुपये काढून घेतले आहेत. गेल्या बुधवारी FII नी २,३९४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली आहे.

अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूकदारांची सावध भूमिका

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना धास्ती लागली आहे. दीर्घकालीन भांडवली नफा करात वाढ अथवा कॉर्पोरेटमध्ये कर वाढ यासारखे नकारात्मक प्रस्ताव गुंतवणूकदारांच्या भावना दुखावू शकतात. यामुळे शेअर बाजारात अस्वस्थेतेचे वातावरण तयार झाले आहे.

कच्च्या तेलाचे दर

कोरोना संकटातून बाहेर पडून चीनकडून मागणीत सुधारणा होईल या आशेने कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रूड ऑइल फ्यूचर्सने आज सलग दुसऱ्या दिवशी उच्च पातळीवर व्यवहार केला आणि दर प्रति बॅरल ८८ डॉलरच्या आसपास राहिला. चीनमधील कोविड परिस्थितीत सुधारणा झाल्याचे वृत्ताने कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. (Stock Market Crash)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news