

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अदानी समूह (Adani Group) गेल्या अनेक वर्षापासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉड करत असल्याचा दावा अमेरिकेतील शॉर्ट- सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने त्यांच्या अहवालातून केला होता. या अहवालानंतर शेअर बाजारात हाहाकार उडाला होता आणि अदानींचे सर्व शेअर्स धडाधड कोसळले. या अहवालामुळे अदानी समुहाचे मुल्यांकन ४८ अब्ज डॉलरने कमी झाले. आता अदानी समुहाने हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालावर ४१३ पानी निवेदनातून उत्तर दिले आहे. आम्ही सर्व कायद्यांचे पालन केले आहे. आम्ही जे काही व्यवहार केले आहेत ते भारतीय कायदे आणि अकाउंटिंग स्टॅडर्ड्सला धरुन आहेत, असा दावा अदानी समुहाने केला आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल २५ जानेवारी रोजी समोर आला होता. त्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. याशिवाय अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत १८ टक्क्यांची घट झाली. यामुळे जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांची चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरण झाली. हिंडेनबर्ग रिसर्चचा अदानींविरोधात अहवाल १०६ पानांचा होता. हिंडेनबर्गने केलेल्या आर्थिक अनियमिततेच्या आरोपांना अदानी समूहाने रविवारी ४१३ पानांतून उत्तर दिले आहे.
हिंडेनबर्गचा अहवाल हा भारत आणि त्याच्या स्वतंत्र संस्थांवर हल्ला असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे. 'हा केवळ एका विशिष्ट कंपनीवर केलेला हल्ला नसून भारत आणि त्यांच्या संस्थांची गुणवत्ता, प्रामाणिकता तसेच स्वातंत्र्यासोबत महत्वाकांक्षा आणि त्याच्या विकासावर केलेला नियोजित हल्ला आहे.' असे नमूद करण्यात आले आहे.
अदानी समूहाचे (Adani Group) सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी द इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत या कथित आरोपांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जुगेशिंदर सिंह यांनी म्हटले आहे की, "यामागे कोणाचा हात आहे याचा कयास आम्हाला लावायचा नाही. आम्ही असे करण्याचा कधी विचारही केला नव्हता. अशा परिस्थितीत असे आम्हाला वाटते की इतर कॉर्पोरेट कंपन्यांही असे काम करत नाहीत.
हे ही वाचा :