

Walking Brain Benefits : चालणे (Walking) हा केवळ एक साधा व्यायाम मानला जात असला, तरी आजवरच्या अनेक वैज्ञानिक संशोधनात त्याचे विविध फायदे समोर आले आहेत. मात्र चालणे आणि मेंदूला नवनवीन कल्पना सुचणे यांचा थेट संबंध आहे का, यावरील संशोधनात रंजक माहिती समोर आली आहे. तुम्हाला एखादी समस्या सोडवताना किंवा काहीतरी नवीन विचार करताना अडचण येत असेल, तर एका जागी बसण्याऐवजी थोडे चालून या... संशोधन सांगते कि, चालणे आणि मेंदूला भन्नाट कल्पना सुचणे याचा परस्पर संबंध आहे.
दैनंदिन आयुष्यात चालणे ही अगदी साधी गोष्ट वाटू शकते; पण आरोग्याच्या दृष्टीने याचे असंख्य फायदे आहेत. कॅनडातील 'मॅकमास्टर युनिव्हर्सिटी'चे संशोधक आणि चालणे व कल्पकता यावरील अभ्यासाचे प्रमुख लेखक ॲलेक्स थाबाने म्हणतात, "दररोज चालण्यामुळे तुम्हाला नवनवीन, हटके आणि मूळ विचार सुचण्यास खरोखरच मदत होते."
आपण काहीतरी नवीन आणि उपयुक्त निर्माण करतो ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्जनशीलता (Creativity) एक बौद्धिक क्षमता आहे. आता सर्जनशील होण्यासाठी दोन प्रकारच्या विचारसरणीची गरज असते. यामध्ये डायव्हर्जंट थिंकिंग (Divergent thinking): ही एक अशी उत्स्फूर्त प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एकाच वेळी अनेक नवीन कल्पना डोक्यात येतात. तर दुसरी कन्व्हर्जंट थिंकिंग (Convergent thinking): या प्रक्रियेत डोक्यात आलेल्या अनेक कल्पनांपैकी सर्वोत्तम काय आहे, याचे मूल्यमापन केले जाते.
मानसशास्त्रज्ञ प्रयोगशाळेत एका विशिष्ट चाचणीद्वारे माणसाच्या कल्पकतेची परीक्षा घेतात. यामध्ये ठरवून दिलेल्या वेळेत रोजच्या वापरातील वस्तूंचे वेगवेगळे उपयोग सांगायचे असतात. उदाहरणार्थ, वर्तमानपत्र हे फक्त बातम्या वाचण्यासाठी नसून, त्याची कागदी टोपी, होडी किंवा विमानही बनवता येते.
मे २०२६ मध्मये 'PLOS ONE' मध्ये प्रकाशित झालेल्या २३ अभ्यासांच्या एका 'मेटा-ॲनालिसिस'मध्ये (सर्व उपलब्ध अभ्यासांचे एकत्रित विश्लेषण) असे दिसून आले की, चालण्यामुळे 'डायव्हर्जंट' विचारक्षमतेत लक्षणीय सुधारणा होते. मात्र, या अभ्यासात असेही समोर आले की, 'कन्व्हर्जंट थिंकिंग'वर चालण्याचा तितकासा प्रभाव पडत नाही. म्हणजेच, सुचलेल्या कल्पनांपैकी सर्वोत्तम कल्पना कोणती, हे ठरवण्यात चालण्याचा थेट फायदा होत नाही, असे थाबाने स्पष्ट करतात.
दैनंदिन जीवनातील हालचाली आणि चालण्याची पद्धत यांचाही सर्जनशीलतेशी संबंध असल्याचे दिसून आले आहे. २०२४ मधील एका अभ्यासात, संशोधकांनी १५७ तरुण प्रौढांच्या शारीरिक हालचालींवर पाच दिवस लक्ष ठेवले. त्यांच्या दैनंदिन जीवनादरम्यान, त्यांना 'अल्टरनेट युजेस टास्क'वर आधारित सर्जनशीलता चाचणीचे प्रश्न विचारण्यात आले. अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या चालण्याचा संबंध अधिक चांगल्या सर्जनशीलतेशी असल्याचे आढळले. ज्या लोकांनी सर्जनशीलतेशी संबंधित प्रश्न विचारण्यापूर्वी अधिक पावले चालली होती, त्यांनी अधिक मौलिक उत्तरे दिली. तसेच, जे लोक सर्वसाधारणपणे जास्त चालतात, त्यांच्याकडून अधिक सर्जनशील कल्पना सुचल्या.
जर्मनीतील हिल्डेशाइम विद्यापीठातील मानसशास्त्र संशोधक आणि २०२४ च्या अभ्यासाचे मुख्य लेखक ख्रिश्चन रोमिंगर यांनी म्हटले आहे की, शारीरिक हालचालींचा संबंध स्वयंपाक, संगीत आणि कला प्रदर्शन यांसारख्या अधिक सर्जनशील कामांशी संबंधित आहे.
'सायंटिफिक रिपोर्ट्स'मध्ये २०२४ साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, रोमिंगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १५६ लोकांच्या शरीरात पाच दिवसांसाठी ॲक्टिव्हिटी सेन्सर्स बसवले. शारीरिक हालचाल अधिक मध्यम व तीव्र असणाऱ्यांना आणि बैठी जीवनशैली कमी होती, त्यांनी सर्जनशील कामांमध्ये अधिक वेळा सहभागी झाल्याचे सांगितले. त्यांनी उच्च सर्जनशील कामगिरी केल्याचेही सांगितले.
२०२२ मधील एका संशोधनात असे दिसून आले की, जेव्हा चालण्याच्या पद्धतीवर किंवा जागेवर बंधने असतात, तेव्हा सर्जनशीलतेवर होणारा सकारात्मक परिणाम कमी होतो. लोकांना एका रिकाम्या कार्यालयात ठराविक मार्गावरून येण्या-जाण्यास सांगितले गेले, तेव्हा त्यांना मुक्तपणे फिरण्याची मुभा असलेल्या परिस्थितीच्या तुलनेत कमी नाविन्यपूर्ण कल्पना सुचल्या.
विशेष म्हणजे, बसलेल्या अवस्थेतही असाच प्रकार दिसून आला; जेव्हा लोकांना स्क्रीनवरील एका ठराविक बिंदूकडे बघत बसण्यास सांगितले गेले, तेव्हा त्यांच्या सर्जनशीलतेत घट झाली. याउलट, जेव्हा त्यांना त्यांच्या सोयीनुसार आरामात बसण्याची मुभा दिली गेली, तेव्हा त्यांची सर्जनशीलता अधिक चांगली होती.
२०२२ च्या या अभ्यासाच्या वरिष्ठ लेखिका आणि कॉग्निटिव्ह न्यूरोसायंटिस्ट (संज्ञानात्मक मज्जासंस्था शास्त्रज्ञ) बार्बरा हँडेल (Barbara Händel) म्हणतात, "आपला विकास बसून राहण्यासाठी झालेला नाही, तर हालचाल करण्यासाठी झाला आहे." अन्न किंवा निवारा शोधणे, शिकणे, संवेदना अनुभवणे किंवा गोष्टी लक्षात ठेवणे "या सर्व गोष्टी प्रामुख्याने हालचाल करत असतानाच केल्या जात असत. त्यामुळे, कदाचित आपली विचारशक्ती आपल्या शारीरिक हालचालींच्या प्रणालीमध्ये खोलवर रुजलेली असावी."
पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे विचार एका जागी थांबले आहेत किंवा काहीच सुचत नाहीये, तेव्हा लक्षात ठेवा. उपाय तुमच्या पायांखालीच आहे!
छोटा ब्रेक घ्या: रोजच्या कामातून वेळ काढून दुपारच्या जेवणानंतर किंवा मधल्या वेळेत १५-२० मिनिटे चाला. यामुळे दिवसभराचा ताण हलका होतो आणि समस्येवर तोडगा काढणे सोपे जाते.
निसर्गाच्या सानिध्यात जा: शक्य असल्यास घराबाहेर किंवा झाडांच्या सानिध्यात फिरा. यामुळे एकाग्रता वाढते. अगदी घरातल्या घरात किंवा ऑफिसमध्ये मारलेली एक चक्करही विचारांना नवी दिशा देऊ शकते.
कल्पना टिपून ठेवा: चालताना अचानक सुचलेली छान कल्पना नंतर विसरून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाइलमधील 'नोट्स' किंवा छोटी डायरी सोबत ठेवा, जेणेकरून कल्पना लगेच लिहून ठेवता येईल.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा: फक्त नवीन कल्पना सुचणे पुरेसे नसते. थाबाने म्हणतात त्याप्रमाणे, "चालण्यामुळे उत्तम कल्पना सुचू शकतात; पण त्या कल्पना किती योग्य आहेत हे परखण्यासाठी तुम्हाला निवांत बसावेच लागेल आणि इतरांशी चर्चा करून त्यावर काम करावे लागेल!"