

ChatGPT Weight Loss Tips: नवीन वर्ष सुरू झालं की वजन कमी करायचं, फिट व्हायचं असा संकल्प अनेक जण करतात. कोणी जिम जॉइन करतं, कोण महागडा डाएट प्लॅन घेतो, तर कोण वैयक्तिक ट्रेनर ठेवतो. पण अलीकडेच एका टेक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाने एक वेगळाच प्रयोग केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याने जिम, ट्रेनर किंवा डाएटशिवाय अवघ्या तीन महिन्यांत 27 किलो वजन कमी केलं, तेही फक्त ChatGPTच्या मदतीने.
हसन नावाच्या या टेक प्रोफेशनलने सोशल मीडियावर अनुभव शेअर करत सांगितलं की, त्याने कोणताही पेड फिटनेस अॅप वापरलं नाही किंवा जिमची फी भरली नाही. रोजचं शिस्तबद्ध आयुष्य आणि काही योग्य AI प्रॉम्प्ट्सवर त्याने भर दिला. मात्र, त्याने एक महत्त्वाची सूचना दिली आहे की, AI वर आंधाळा विश्वास ठेवू नका. डाएट किंवा व्यायाम सुरू करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
सर्वात आधी त्याने स्वतःचं वजन, उंची, वय आणि उद्दिष्ट ChatGPT समोर मांडलं. “फॅट कमी करायचं आहे आणि शरीर सुदृढ बनवायचं आहे” हे सांगून त्याने 12 आठवड्यांचा प्लॅन मागितला, जो जिमशिवायही करता येईल.
दुसऱ्या टप्प्यात त्याने रोजच्या कॅलरी, प्रोटीनचे प्रमाण आणि कोणते पदार्थ टाळायचे हे ठरवून आठवड्याचा आहाराचा प्लॅन तयार करून घेतला. महागड्या पदार्थांऐवजी घरी सहज करता येणाऱ्या डिशेसवर भर दिला.
तासन्तास जिममध्ये घालवण्याऐवजी, घरच्या घरी 25 ते 35 मिनिटांत होणारा व्यायाम त्याने केला. कोणत्याही उपकरणांशिवाय व्यायाम केला आणि आठवड्यानुसार तो थोडा थोडा कठीण होत गेला.
वजन कमी करताना गोड खाण्याची सवय मोठा अडथळा ठरते. यासाठी त्याने कमी कॅलरीचे, पण पोट भरणारे स्नॅक्स कोणते असू शकतात याची यादी तयार केली, ज्यामुळे अनावश्यक खाणं टाळता आलं.
फक्त शरीर नव्हे तर मनही तयार असणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन त्याने रोज काही मिनिटं डायरी लिहिण्याची सवय लावली. उद्दिष्टं आणि सकारात्मक विचार यामुळे प्रेरणा कायम राहिली. दर आठवड्याला स्वतःची प्रगती तपासून पुढील आठवड्यासाठी छोटे बदल करत राहिल्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहिली.
वजन कमी करण्यासाठी फक्त जिम किंवा महागडे ट्रेनर आवश्यक असतात असं नाही. योग्य माहिती, शिस्त आणि सातत्य असेल तर तंत्रज्ञानाची मदतही उपयोगी ठरू शकते. मात्र, प्रत्येक शरीर वेगळं असतं, त्यामुळे कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
नोंद: डाएट किंवा व्यायामात बदल करण्याआधी डॉक्टर, न्यूट्रिशनिस्ट किंवा प्रशिक्षकांचा सल्ला घ्यावा.