

या संशोधनातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत पाणी केवळ माध्यम नसून एक सक्रिय घटक म्हणून काम करते. बहुतांश प्लास्टिक हे 'हायड्रोफोबिक' (पाण्याला दूर ढकलणारे) असतात.
Microplastic Health Risk : मागील तीन दशकांमध्ये प्लास्टिकचा वापराने आपलं जगण व्यापलं आहे. अन्नपदार्थांच्या पॅकेजिंग असा की पाण्याच्या बाटली ते मुलांची खेळण्यांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये त्याचा वापर होतोय. आजवर असा समज होता की, प्लास्टिक हे रासायनिकदृष्ट्या स्थिर असते आणि आजूबाजूच्या घटकांशी सहज अभिक्रिया करत नाही, मात्र या प्लास्टिकच्या अत्यंत सूक्ष्म कणांमध्ये विघटन होते, तेव्हा हा समज पूर्णपणे चुकीचा ठरू शकतो, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. प्लास्टिकचे अत्यंत लहान कणांमध्ये विघटन होते तेव्हा हा अंदाज खरा ठरेलच असे नाही, असे नवीन संशोधन सुचवते. तसेच रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय मानले जाणारे प्लास्टिक शरीराचे नुकसान कसे करते, याचे उत्तर नव्या संशोधनात मिळाले आहे.
मोठ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे तुकडे होऊन मायक्रोप्लास्टिक आणि त्याहूनही लहान नॅनोप्लास्टिक तयार होतात. तेव्हा उघड्या पडलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात वाढते. शास्त्रज्ञांनी आता शोधून काढले आहे की, हे नव्याने उघडे पडलेले पृष्ठभाग पाण्याशी अनपेक्षित मार्गांनी संवाद साधू शकतात, असे प्रतिक्रियाशील रेणू सजीवांच्या पेशींना हानी पोहोचवू शकतात. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील (बर्कले) संशोधकांनी या रासायनिक प्रक्रियेचा उलगडा केला असून, त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध 'नेचर' (Nature) या विज्ञान नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. मायक्रोप्लास्टिक हे केवळ निष्क्रिय कण असतात, या जुन्या धारणेला या संशोधनाने मोठा धक्का दिला आहे.
"प्लास्टिकचे अत्यंत लहान कणांमध्ये तुकडे होतात, तेव्हा त्यांच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ खूप वाढते. हे मायक्रोप्लास्टिक स्वतःभोवतीच्या पाण्याच्या रचनेत बदल घडवून आणतात. त्यातून अत्यंत ऊर्जावान आणि क्रियाशील रॅडिकल्स म्हणजेच 'रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज' (ROS) तयार होतात. मायक्रोप्लास्टिकच्या संपर्कात आल्याने प्राण्यांमध्ये आणि संभाव्यतः मानवी शरीरात जे जैविक नुकसान दिसून येते, त्यामागे हाच घटक कारणीभूत असण्याची दाट शक्यता आहे," असे कोलंबिया विद्यापीठातील रसायनशास्त्र आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक वेई मिन यांनी स्पष्ट केले आहे.
या नव्या शोधामुळे मायक्रोप्लास्टिक मानवी शरीरात प्रवेश केल्यावर नेमके काय घडते, याबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मानवी रक्त आणि पेशींमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे शरीरात गेलेले हे सूक्ष्म कण तिथेही सातत्याने रासायनिक अभिक्रिया सुरू ठेवू शकतात. शरीरात गेल्यानंतर हे फ्लॉस्टिक मायक्रोप्लास्टिक 'रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज' (ROS) तयार करू शकतात. हे अत्यंत क्रियाशील रेणू शरीरातील पेशी आणि ऊतींच्या रचनेला हानी पोहोचवू शकतात. जरी या प्रक्रियेमुळे मानवामध्ये नेमका कोणता आजार होतो हे अद्याप पूर्णपणे सिद्ध झाले नसले, तरी मायक्रोप्लास्टिकमुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांमागील शास्त्रीय कारण या संशोधनातून समोर आले आहे.
प्राध्यापक मिन यांच्या प्रयोगशाळेने २०२४ मध्येही यासंदर्भात एक महत्त्वाचे संशोधन केले होते. लेझर-आधारित मायक्रोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी बाटलीबंद पाण्याच्या एका लिटरमध्ये सरासरी २ लाख ४० हजार अत्यंत सूक्ष्म प्लास्टिक कण (प्रामुख्याने नॅनोप्लास्टिक्स) असल्याचे शोधून काढले होते. पूर्वीच्या अंदाजापेक्षा हे प्रमाण १० ते १०० पटींनी अधिक होते.
मायक्रोप्लास्टिकच्या वाढत्या धोक्याची दखल आता जागतिक पातळीवर घेतली जात आहे. अमेरिकन सरकारने २०२६ मध्ये मानवी शरीरातील विषारी मायक्रोप्लास्टिकचा अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी १४४ दशलक्ष डॉलर्सचा विशेष उपक्रम सुरू केला आहे. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेने (EPA) पिण्याच्या पाण्यातील संभाव्य घातक घटकांच्या यादीत पहिल्यांदाच मायक्रोप्लास्टिकचा समावेश केला आहे.
दरम्यान, 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन', 'नेचर मेडिसिन' आणि 'नेचर हेल्थ' यांसारख्या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासांनुसार, मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिकच्या संपर्काचा संबंध हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक (पक्षाघात), स्मृतिभ्रंश (Dementia) आणि ब्रेन ट्यूमर यांसारख्या गंभीर आजारांशी असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. मात्र, रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय मानले जाणारे प्लास्टिक शरीराचे नुकसान कसे करते, हे कोडे आजवर सुटले नव्हते. आता या नव्या संशोधनाने त्याचे उत्तर दिले आहे.
या संशोधनातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत पाणी केवळ माध्यम नसून एक सक्रिय घटक म्हणून काम करते. बहुतांश प्लास्टिक हे 'हायड्रोफोबिक' (पाण्याला दूर ढकलणारे) असतात. पाणी अशा प्लास्टिकच्या पृष्ठभागावर आदळल्यानंतर पाण्याचे रेणू आणि विद्युत भारित कण सामान्य पाण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वागू लागतात. या प्रक्रियेत इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होऊन अत्यंत क्रियाशील रॅडिकल्स तयार होतात. कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक तेरेसा हेड-गॉर्डन यांच्या पथकाने संगणकीय सिम्युलेशनद्वारे याचा सखोल अभ्यास केला. प्लास्टिकच्या पृष्ठभागाजवळ जमा होणारे ऋण भारित 'हायड्रॉक्साईड आयन' इलेक्ट्रॉन गमावून 'हायड्रॉक्सिल रॅडिकल्स' तयार करतात. हे रॅडिकल्स जैविक रेणूंचे मोठे नुकसान करण्यास सक्षम असतात.
या रासायनिक प्रक्रियेचे गूढ उलगडल्यामुळे भविष्यात पाण्याच्या संपर्कात आल्यावरही घातक रेणू तयार न करणारे सुरक्षित प्लास्टिक विकसित करणे शास्त्रज्ञांना शक्य होणार आहे. याचा फायदा केवळ मानवी आरोग्यालाच नाही, तर जलचर आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठीही होईल.कारखान्यांतून बाहेर पडणारे सांडपाणी, कपडे धुण्याची केंद्रे (लॉन्ड्रोमॅट्स), मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करणे किंवा उन्हात ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी यांसारख्या दैनंदिन गोष्टींमधून मायक्रोप्लास्टिक तयार होते, असे या संशोधनाचे सह-लेखक बेईझान यान यांनी नमूद केले. प्लास्टिक प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे.