Calorie Burn होण्यामागचे नवे गुपित शास्त्रज्ञांना उलगडले ; वजन कमी करणाऱ्या भविष्यातील औषधांसाठी नवे संकेत

'ब्राउन फॅट'वर नियंत्रण मिळवणे हे आधी वाटले होते त्यापेक्षा अधिक आव्हानात्मक
New Clues to Calorie Burn
प्रातिनिधिक छायाचित्र. AI-generated image
Published on: 
Updated on: 

New Clues to Calorie Burn : शरीरातील सामान्य चरबीपेक्षा 'ब्राउन फॅट' (तपकिरी चरबी) हा प्रकार उष्णता निर्माण करण्यासाठी कॅलरीज जाळण्याचे काम करतो. त्यामुळेच भविष्यात लठ्ठपणावर प्रभावी उपचार शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचे या चरबीकडे विशेष लक्ष लागले आहे. मात्र, औषधांच्या माध्यमातून 'ब्राउन फॅट'वर नियंत्रण मिळवणे हे आधी वाटले होते त्यापेक्षा अधिक आव्हानात्मक असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

'ब्राउन फॅट' सक्रिय असणार्‍यांचे वजन राहते नियंत्रणात

औषधांच्या मदतीने मानवी शरीरातील ही ऊर्जा जाळणारी यंत्रणा सक्रिय करता येईल का, याचा अभ्यास स्वित्झर्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ बासेल आणि युनिव्हर्सिटी हॉस्पिटल बासेल येथील संशोधकांनी केला. आपल्या शरीरातील पांढरी चरबी (व्हाईट फॅट) प्रामुख्याने ऊर्जा साठवून ठेवण्याचे काम करते, तर 'ब्राउन अ‍ॅडिपोज टिश्यू' अर्थात तपकिरी चरबी शरीराला ऊब देण्यासाठी ऊर्जा खर्च करते. व्यक्तींच्या शरीरात ही तपकिरी चरबी अधिक सक्रिय असते, त्यांचे वजन नियंत्रणात राहते आणि त्यांची चयापचय क्रियाही (मेटाबॉलिझम) उत्तम राहते, असे संशोधकांच्‍या निदर्शनास आले आहे.

New Clues to Calorie Burn
Microplastic Health Risk : मायक्रोप्लास्टिक आपल्या कल्पनेपेक्षा अधिक धोकादायक! संशोधनातून समोर आले नवे कारण

शास्त्रज्ञांनी नेमका कशाचा अभ्‍यास केला?

थंडीच्या संपर्कात आल्याने शरीरातील ही तपकिरी चरबी नैसर्गिकरीत्या सक्रिय होते. हीच प्रक्रिया औषधांद्वारे घडवून आणता येईल का, याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ बासेलचे प्राध्यापक मॅथियास बेट्झ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शरीरातील 'बीटा-२ अ‍ॅड्रेनर्जिक रिसेप्टर' सक्रिय केल्यास मानवी शरीरातील तपकिरी चरबीला चालना मिळते का, याचा सखोल अभ्यास केला. या संशोधनाचे निष्कर्ष 'सेल मेटाबॉलिझम' जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

New Clues to Calorie Burn
आरोग्‍य : महागड्या ‘सुरक्षाकवचा’चा बडगा

कसे झाले संशोधन?

संशोधकांनी ११ निरोगी स्वयंसेवकांवर दोन प्रयोग केले. यामध्ये सौम्य थंडीचा शरीरावर होणारा परिणाम आणि 'बीटा-२ रिसेप्टर्स'ना चालना देणाऱ्या औषधाचा परिणाम यांची तुलना करण्यात आली. सहभागी व्यक्तींनी किती ऊर्जा खर्च केली याची मोजमाप करण्यात आली आणि तपकिरी चरबीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 'पेट/सीटी' (PET/CT) स्कॅनचा वापर करण्यात आला.

संशोधनात काय आढळले?

या दोन्ही प्रयोगांमध्ये शरीराने अधिक ऊर्जा जाळल्याचे दिसून आले. मात्र, स्कॅनच्या अहवालातून एक महत्त्वाचा फरक समोर आला f[, केवळ थंडीच्या संपर्कात आल्यानंतरच तपकिरी चरबी खऱ्या अर्थाने सक्रिय झाल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले; कारण या वेळी या पेशींनी औषध दिल्यानंतरच्या स्थितीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात ग्लुकोज शोषून घेतले होते.

New Clues to Calorie Burn
Kidney Health : जास्त पाणी पिऊनही किडनी स्टोन होतोय? 'द लॅन्सेट'चा धक्कादायक खुलासा!

शरीरातील अतिरिक्त ऊर्जा नेमकी कोठे खर्च होत आहे, हे अद्याप कोडेच

याबाबत माहिती देताना प्रा. बेट्झ म्हणाले की, "फेनोटेरॉल औषध दिल्यानंतर तपकिरी चरबी तितकीशी सक्रिय झालेली नसतानाही शरीराचा ऊर्जा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. शरीराचा ऊर्जा खर्च वाढला याचा अर्थ तपकिरी चरबी सक्रिय झालीच आहे, असे अजिबात नाही, हे या अभ्यासातून स्पष्ट होते."शरीरातील ही अतिरिक्त ऊर्जा नेमकी कोठे खर्च होत आहे, हे अद्याप एक कोडेच आहे. फेनोटेरॉलमुळे स्नायू (स्केलेटल मसल) किंवा पांढरी चरबी यांसारख्या इतर पेशींमधील ऊर्जेचा वापर वाढत असावा, असा संशोधकांचा प्राथमिक अंदाज आहे.

वजन कमी करणाऱ्या भविष्यातील औषधांसाठी नवे संकेत

मानवी शरीरातील तपकिरी चरबीवर नियंत्रण ठेवणारी जैविक यंत्रणा आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीची असल्याचे संशोधनातील निष्कर्षांवरून दिसून येते. मानवी पेशींच्या विश्लेषणातून असे सूचित होते की, तपकिरी चरबी पूर्णपणे सक्रिय करण्यासाठी केवळ एका रिसेप्टरला चालना देण्याऐवजी अनेक रिसेप्टर्स आणि जैविक संकेतांचे एकत्रित कार्य आवश्यक असू शकते. ही जैविक प्रक्रिया पूर्णपणे समजून घेतल्यास लठ्ठपणावर उपचार करण्याचे नवे मार्ग खुले होऊ शकतात.

New Clues to Calorie Burn
Winter Weight Gain | हिवाळ्यात वजन वेगाने का वाढते?

अधिक सखोल संशोधनाची गरज

सध्याची वजन कमी करणारी औषधे प्रामुख्याने भूक कमी करण्याचे काम करतात. परंतु, जसजसे वजन कमी होऊ लागते, तसतसे शरीर कमी कॅलरीज जाळून या बदलाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते (यामुळे वजन घटण्याची प्रक्रिया मंदावते). अशा वेळी भूक कमी करण्यासोबतच शरीरातील कॅलरीज जाळण्याचा वेगही वाढवणारे उपचार उपलब्ध झाल्यास, शरीराच्या या नैसर्गिक प्रतिकारावर मात करणे शक्य होईल. "भूक कमी करणे आणि शरीराचा ऊर्जा खर्च वाढवणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधता आल्या तर ते सर्वात आदर्श ठरेल," असे प्रा. बेट्झ यांनी नमूद केले. "मात्र त्यापूर्वी शरीरातील तपकिरी चरबीचे नियमन नेमके कसे चालते, हे आपल्याला अधिक सखोलपणे समजून घ्यावे लागेल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.