Winter Weight Gain | हिवाळ्यात वजन वेगाने का वाढते?

Winter Weight Gain |
Winter Weight Gain | हिवाळ्यात वजन वेगाने का वाढते?
Published on: 
Updated on: 

लंडन : हिवाळ्याची चाहूल लागताच पोशाखासोबतच इतर अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल दिसून येतात. थंडीच्या दिवसांत आहाराच्या सवयींमध्येही बराच बदल होतो. अनेकजण हिवाळ्यात सुकामेवा आणि डिंकाचे लाडू खातात. त्यामुळे काहींचे वजन पूर्वीपेक्षा अधिक वाढते. मात्र, यामागे केवळ खाणेपिणे हेच कारण आहे की आणखी काही, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

युनायटेड किंगडमच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (NHS) अधिकृत आरोग्य संकेतस्थळानुसार, आधुनिक विज्ञान आणि जीवशास्त्र या गोष्टीला दुजोरा देतात. हिवाळ्याच्या काळात आपल्या शरीरात अनेक बदल होतात आणि त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. हिवाळ्यात मानवी शरीर ऊर्जा आणि कॅलरीज साठवून ठेवण्याची प्रवृत्ती दाखवते. थंडीत तापमान कमी झाल्यामुळे शरीर स्वतःला उबदार ठेवण्यासाठी चरबी साठवण्याचा प्रयत्न करते. थंडीच्या दिवसांत सूर्यप्रकाश कमी मिळतो, ज्यामुळे आपल्या मेंदूतील सेरोटोनिन म्हणजेच आनंद देणाऱ्या संप्रेरकाची (हॉर्मोन) पातळी कमी होऊ लागते. ही कमतरता भरून काढण्यासाठी मेंदूकडून गोड आणि कर्बोदके (कार्बोहायड्रेटस्‌) जास्त असलेल्या पदार्थांची लालसा निर्माण होते आणि त्यातून वजन वाढू शकते. या ऋतूत चयापचय क्रियेतही (मेटाबॉलिझम) बदल जाणवतात. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी चयापचयाची पद्धत बदलते. शरीराला आतून उष्णता टिकवून ठेवण्यासाठी अधिक कॅलरीजची गरज भासते, त्यामुळे अनेक जणांना हिवाळ्यात अधिक भूक लागते. अनेकदा थंडीमुळे लोक व्यायामशाळेत (जिम) जाणे किंवा चालायला (वॉक) जाणे टाळतात. त्यामुळे घेतलेल्या कॅलरीज खर्च होत नाहीत आणि त्यांचे रूपांतर चरबीत होऊ लागते. थंडीच्या दिवसात वजन वाढू नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे योग्य ठरते. हिवाळ्यात तहान कमी लागते किंवा पाणी पिण्याची इच्छा कमी होते, मात्र शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी शक्य तितके पाणी आवर्जून प्यावे. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा अधिक समावेश करावा. थंडीमुळे घराबाहेर पडणे शक्य नसल्यास घरातच व्यायाम किंवा योगासने करता येतात. या सवयींचे पालन केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.