‘स्मार्ट टॅटू’ मोजणार हृदयाचे ठोके, रक्तातील साखर! | पुढारी

‘स्मार्ट टॅटू’ मोजणार हृदयाचे ठोके, रक्तातील साखर!

न्यूयॉर्क : गोंदण्याची कला तशी जुनीच. मात्र, ‘जुनं ते सोनं’ म्हणत अनेक जुन्या गोष्टीच ‘फॅशन’च्या नावाखाली नव्याने येत असतात. ‘टॅटू’ हा प्रकारही असाच आहे. आता तर ‘स्मार्ट टॅटू’ही येत आहेत. हे टॅटू केवळ देहाच्या शोभेसाठी नसून देहाच्या आरोग्यासाठीही आहेत. ते आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास मदत करतील. आता असे ‘इंजेक्टेबल स्मार्ट टॅटू’ विकसित केले जात आहेत. त्यांना त्वचेच्या आत इंजेक्ट केले जाऊ शकते.

संशोधकांचे म्हणणे आहे की या मार्गाने पारंपरिक शाईची पद्धतही बदलली जाऊ शकते. हे स्मार्ट टॅटू आपल्या हृदयाचे ठोके मोजतील तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणही मोजू शकतील. आरोग्याविषयीच्या अनेक गोष्टींवर हे टॅटू लक्ष ठेवतील. अगदी किडनीचे काम कसे सुरू आहे याकडेही त्यांचे लक्ष असेल. आरोग्याशी निगडीत निर्धारित मानकांमध्ये बदल दिसून आला तर ते इशाराही देऊ शकतील. मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माहितीनुसार ग्लुकोज आणि पीएच स्तरासहीत शरीरातील तरल पदार्थांमध्ये जैव रासायनिक माहितीबाबत तीन तुकड्यांमध्ये उत्तरासाठी चार बायोसेन्सरने रंग बदलले जातात.

संशोधक डॉ. अली यतिसेन यांनी सांगितले की दैनंदिन जीवनात असे तंत्रज्ञान आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामध्ये प्रत्यारोपणयोग्य आणि इंजेक्टेबल सेन्सरची एक विस्तृत श्रुंखला समाविष्ट आहे जी वास्तविक वेळेत मानवी आरोग्याचा रिपोर्ट देण्यासाठी चांगले काम करते. स्मार्ट टॅटू पिग्मेंटने मानवी शरीरात काही बायोमार्कच्या निगराणीसाठी इंजेक्ट केले जाऊ शकतात.

Back to top button