श्रीमंत होण्याचा फंडा काय आहे, पहाटे उठणारी माणसे श्रीमंत होतात का तुम्हाला काय वाटतं? सकाळी लवकर लवकर घरामध्ये आईने हाक मारली तर किती कंटाळ येतो यार! घरातली आई सगळ्यात आधी लवकर उठते. कारण तिला चहा, नाष्ता, डबा बनवायचा असतो. मग, नंतर बाकीचे निवांत उठतात. हातात सर्वकाही आयतं मिळतं. कॉलेजला जाण्याआधी, कामाला जाण्याआधी डबादेखील भरून हातामध्ये तयार असतो. आई लवकर उठते म्हणून तिला ही सर्व कामे पटापट करायला वेळ मिळतो.
मग आपण काय करतो? घरातल्या भांड्यांचा आवाज येतो म्हणून आईवर राग काढत पांघरूण तोंडावर घेऊन आराम झोपतो. मग, पण आपली कामे करायला स्वत: लवकर का नाही उठत? मग, खरंच पहाटे उठणारी माणसे श्रीमंत होतात का?
अधिक वाचा –
श्रीमंत असणारी माणसे पहाटे लवकर उठतात का? असं म्हटलं जातं की, 'लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे'.
लवकरच झोपल्याने सकाळी लवकरच उठायला होतं. आणि आरोग्यही चांगलं राहतं. अनेक यशस्वी व्यक्ती पहाटे लवकर उठून आपल्या कामाला लागतात. पहाटे लवकर उठणारी माणसे श्रीमंत होतात का? यामागे गौडबंगाल काय आहे? वाचा ही संपूर्ण माहिती.
असं म्हटलं जातं की, अनेक यशस्वी लोकांना सकाळी उठून आपली कामे करण्यास पुरेसा वेळ मिळतो. ठरलेल्या नियोजन, कामाव्यतिरिक् कामे करण्यासाठी त्यांना वेळ मिळतो. लवकर उठल्याने त्यांचे आरोग्य टिकून राहते. दवाखान्यात ढिगभर पैसे घालवण्याची वेळ त्यांच्यावर सहसा येत नाही. त्यामुळे लवकर उठून उत्साहाने, सकारात्मक विचारांनी कामाला सुरवात झाल्यास आपल्या कामात यश हमखास मिळतं.
सकाळी लवकर उठल्यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात फ्रेश होते. उत्साह येतो. दिवसभर आपल्याला कोणती कोणती कामे करायची आहेत, हे पटकन सुचतं. ती कामे पूर्णत्वास होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू होतात. सकाळी लवकर उठून तुम्ही मॉर्निंग वॉक, जीम अथवा घरच्या घरी व्यायाम करू शकता. शुध्द हवेत ऑक्सिजन मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुम्ही फ्रेश वातावरणात रनिंग (पळायला, चालायला) जाऊ शकता. घरी पूजा, प्रार्थना वेळेवर करता येतात. घरातील अन्य व्यक्तींना त्यांच्या कामात मदतही करू शकता. सकाळी उठून शांत वातावरणात अभ्यासही करता येतो.
काही वेळा वेळ झाला म्हणून आपण नाष्ता करत नाही. न खाताच आपण बाहेर पडतो. पण, सकाळी नाष्ता खाणे, आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. काही जण जेवूनच बाहेर पडतात. अशावेळी नाष्ता किंवा जेवायला पुरेसा वेळ मिळतो. वेळेवर रेल्वे, बस मिळावी म्हणून पटपट कामे आवरून बाहेर पडू शकता. वेळेवर शाळा, कॉलेज, कामाला जाऊ शकता. मग, इथे तुमची धावपळ होणार नाही. अगदी पळापळ न करता, तुम्ही ही सर्व कामे आटोपशीर आणि व्यवस्थितपणे पार पाडू शकता.
अधिक वाचा-
सकाळी लवकर उठून जर तुम्ही बाहेर फिरायला गेलात तर निसर्गाचा आनंद तुम्हाला घेता येईल. सुर्योदय पाहणं, हे अनेकांना जमत नाही. पण, लवकर उठून गेल्यानंतर उगवता सूर्य पाहणं, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणं, एकांत आणि शांत वातावरणात चालणं, हे सर्व तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य जपायला कारणीभूत ठरतं. चालल्याने, रनिंग, मेडिटेशन, व्यायाम केल्यानं तुमचं आरोग्य सुधारतं. तुम्ही फिट राहू शकता. जे लोक लठ्ठ आहेत, त्यांच्यासाठी तर लवकर उठून व्यायाम करणे, वॉकिंगला जाणे आवश्यक आहेत.
शरीरातील अतिरिक्त चरबी करण्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे. काही जण मोकळ्या हवेत फिरतात, तर काही जण मैदान निवडतात, काहींना बागेत हिरव्यागार गवतावर अनवाणी चालायला आवडतं. यामुळे तुम्ही मानसिक तणावापासून दूर राहू शकता.
अनेक वेगवेगळ्या आयडिया तुम्हाला सूचतात. आत्मविश्वास वाढण्याबरोबरचं स्फूर्ती येते. हा उत्साह रात्रीपर्यंत कायम टिकून राहतो.
अधिक वाचा –
खरंतरं तुम्ही पहाटे ५ किंवा सव्वा पाच दरम्यान उठला की, तुम्हाला रात्री लवकर डोळ्यावर झापड येऊ लागते. म्हणजेच १० वाजता निवांत आणि शांत झोप लागते. मग, इथे तुमचा रात्री टीव्ही पाहण्याचा, इंटरनेटवर किंवा मोबाईलमध्ये डोकं घालून बसण्याचा कार्यक्रम आपोआप रद्द होतो. (स्वानुभवावरून) शिवाय झोप लवकर येत असल्यामुळे रात्रीचं जेवण लवकर होतं.
असं म्हटलं जातं की, रोज किमान ८ तास झोप घेणं आवश्यक आहे. एखाद्या वेळी ७ तासांची झोप झाली तरी फारसा फरक पडत नाही. रात्री ९ किंवा १० वाजता झोपल्यास पहाटे पाच – साडेपाचला जाग येतेच. त्याचबरोबर, तुम्ही अलार्मदेखील लावून ठेवू शकता. काही वेळा दुपारी वेळ मिळाल्यास वामकुक्षीही घेता येते, असे काहीजण म्हणतात. लवकर उठल्याने दिवसभर येणारा कंटाळा, किंवा बोअरिंग होण्याचा प्रकार टाळता येतोय त्याच उत्साहाने तुम्ही घरातील, ऑफिसमधील अथवा तुमच्या कामाच्या ठिकाणी कामे पूर्ण करता येतात.
पहाटे लवकर उठून तुम्ही कामे आवरता, दिवसभर कॉलेज, ऑफिस करून जेव्हा घरी परतता. त्यावेळी अगदी संध्याकाळीदेखील तुम्ही फ्रेश राहता. काहीतरी नवीन करण्याची कल्पना तुमच्या डोक्यात येऊ शकतात. जर तुम्ही संध्याकाळचा एखादा क्लास लावला असेल, तर क्लासला जाण्याचा उत्साहदेखील कायम राहतो. तेव्हा तेथे तुम्हाला कंटाळा येणार नाही. कारण, सकाळी उठून तुम्ही मॉर्निंग वॉक, व्यायाम केलेला असता. ती एनर्जी, उत्साह संध्याकाळपर्यंत कायम राहतो.
मिळालेल्या मोकळ्या वेळेत तुम्ही तुमचे वेगवेगळे छंद जोपासू शकता. एखादा चित्रपट पाहायलादेखील तुम्ही जाऊ शकता. तुमच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवू शकता. मित्र-मैत्रीणींना भेटू शकता. उत्साह टिकून राहिल्याने तुम्हाला या गोष्टी साध्य करू शकता. जर झोप पूर्ण झाली नसेल तर दिवसभर उत्साह राहणार नाही आणि मग, तुमच्या सर्व नियोजनावर पाणी फिरू शकते.
पहाटे उठून ही सर्व कामे केल्याने तुमची दगदग कमी होऊन पूर्ण दिवस आनंदात जाईल.
– संकलन : स्वालिया शिकलगार, पुढारी ऑनलाईन डेस्क
अधिक वाचा-
पाहा व्हिडिओ – योगासनांची प्रात्यक्षिके जागतिक योगा दिन निमित्त