Closing Bell : तीन दिवसांच्‍या तेजीला ‘ब्रेक’, आज शेअर बाजारात काय घडलं? | पुढारी

Closing Bell : तीन दिवसांच्‍या तेजीला 'ब्रेक', आज शेअर बाजारात काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारांमधील संमिश्र संकेतांचा परिणाम देशातंर्गत शेअर बाजारावर दिसले. सलग तीन दिवसांच्‍या तेजीच्‍या सत्राला आज (दि.७) ब्रेक बसला. आजच्‍या व्‍यवहारात दिवसभर सुरु असलेली पडझड अखेरच्‍या सत्रात थांबली. अखेर सेन्‍सेक्‍स १६ अंकांच्‍या घसरणीने ६४,९४२ वर तर निप्‍टी १९,४०६ वर स्‍थिरावला. सोमवारी (दि. ६) सेन्सेक्स 594 अंकांच्या वाढीसह ६४.९५८ वर बंद झाला होता. ( Stock Market Closing Bell)

जागतिक बाजारांमधील संमिश्र संकेताचे पडसाद

आज शेअर बाजारात  व्‍यवहाराची सुरुवात हाेताच जागतिक बाजारांमधील संमिश्र संकेतांचा पडसाद उमटले. निफ्टी 50 0.03% खाली 19,404.05 वर तर सेन्सेक्स 62 अंकांनी वधारत 65,021.29 वर उघडला. मात्र यानंतर ही दिवसभर घसरणीचे सत्र सुरुच राहिले. मात्र बाजारात आजचे व्‍यवहार बंद हाेण्‍याच्‍या अर्धातास आधी पडझड सावरली. सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट बंद झाले.

मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक वधारत बंद झाले तर फार्मा, पीएसई, धातू समभाग वधारत राहिले. रिॲल्टी आणि ऑटो कंपन्‍यांच्‍या शेअर्सवर दबाव दिसला. हिरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी पोर्ट्स हे निफ्टी घसरले. सन फार्मा, बीपीसीएल, एनटीपीसी, ॲक्सिस बँक आणि इंडसइंड बँक निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 16.29 अंकांच्या ( 0.03 टक्‍के) घसरणीसह 64,942.40 वर बंद झाला. निफ्टी 5.05 अंकांच्या (0.03 टक्‍के ) घसरणीसह 19406.70 च्या पातळीवर बंद झाला.

विक्रीला प्राधान्‍य

सोमवारी सलग सातव्या दिवशी अमेरिकन बाजाराने तेजी अनुभवली होती. मात्र आज जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळल्‍याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण पाहायला मिळली. बाजारात व्‍यवहाराला सुरुवात झाल्‍यानंतर बँकिंग आणि रियल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री पाहायला मिळाली.

‘मिडकॅप’मध्‍ये उत्साह, रिॲल्टीमधील वाढीला ब्रेक

आज मिडकॅप शेअर्समध्‍ये गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहिला. तर आज सलग सात दिवसांच्या वाढीनंतर रिॲल्टीमधील वाढीला ब्रेक लागला आहे. बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, सिप्ला आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज निफ्टीमध्ये सर्वाधिक वधारले. डिव्हिस लॅब्स, अपोलो हॉस्पिटल्स, एल अँड टी, कोल इंडिया आणि एचडीएफसी बँक हे निफ्टीचे सर्वाधिक नुकसान करणारे ठरले.

डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर

डॉलरच्या तुलनेत आज रुपया कमजोर झाला. रुपया 2 पैशांनी खाली येवून 83.23 वर उघडला. डॉलरच्या तुलनेत इतर आशियाई चलनांमध्येही घसरण झाली. दक्षिण कोरियाच्या चलनात ०.६ टक्के, मलेशियन रिगिनमध्ये ०.४६ टक्के, फिलीपिन्स पेसोमध्ये ०.३७ टक्के, तैवान डॉलरमध्ये ०.२६ टक्के घसरण आहे. इंडोनेशिया रुपियामध्ये ०.२ टक्के, सिंगापूर डॉलरमध्ये ०.१६ टक्के आणि चीनच्या चलनात ०.११ टक्के घसरण झाली.

इस्रायलने युद्धाला थोडा विराम देण्याचे संकेत दिल्‍याने कच्च्या तेलाच्‍या किंमतीवर दबाव झाला आहे. याचेही सकारात्‍मक परिणाम बाजारावर होणार  असल्‍याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा :

 

Back to top button