मुलांना कोणत्‍या वयात मोबाईल फोन द्यावा? नवीन संशाेधन काय सांगते? | पुढारी

मुलांना कोणत्‍या वयात मोबाईल फोन द्यावा? नवीन संशाेधन काय सांगते?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुलं खूपच हट्ट करतात, अभ्‍यासावर लक्षच नाही, सतत मोबाईलवरच असतात अशा अनेक तक्रारी काेराेना काळानंतर दिसत आहेत. मुलं ही त्‍यांच्‍या वयाप्रमाणे वागणार ही जरी गृहीत धरलं तरी सर्वसाधारणपणे मुलांच्‍या वागणुकीमध्‍ये झालेला बदलास मोबाईल फोन जबाबदार असल्‍याचे निष्‍कर्ष काढला जातो. मुलांना कोणत्‍या वयात मोबाईल फोन द्यावा, या प्रश्‍नावर नवीन संशोधनाने प्रकाशझोत टाकला आहे. ( Child and mobile phones ) जाणून घेवूया या संशोधनताील निष्‍कर्षाविषयी…

मुलांवर मोबाईल फोनमुळे होणार्‍या मानसिक परिणामाविषयी सेपियन लॅब्सने संशाेधन केले. यासंदर्भात जागतिक मानसिक आरोग्याचे सर्वेक्षण आणि मेंटल हेल्थ कोटिएंट मूल्यांकनाचा वापर केला गेला. सोशल मीडियामुळे मुलांच्‍या स्‍वभावात हाेणारे बदल, सामाजिक जाण आणि मानसिक आरोग्यावर होणार्‍या परिणाम याचाही अभ्‍यास नवीन संशाेधनात करण्‍यात  आला.

Child and mobile phones : मुलांच्‍या मानसिक आराेग्‍यावर परिणाम

मुलांना काेणत्‍या वयात पहिला स्मार्टफोन मिळतो याचा आणि मुलांच्‍या  मानसिक आरोग्यामध्‍ये एक संबंध आहे. खूप कमी वयात मुलांच्‍या हाती मोबाईल फोन आला तरी त्‍याचे हानीकारक परिणाम होतात. जी मुले कमी वयात स्मार्टफोन किंवा टॅबलेट वापरतात त्‍यांची मानसिकता प्रौढांसारखी होते. ज्यांना त्यांचा पहिला स्मार्टफोन लहान वयात मिळाला त्या मुलांच्‍या नकारात्‍मक विचारात वाढ हाेते इतरांबद्दल आक्रमकतेची भावना आणि वास्तवापासून अलिप्त राहण्याची भावना येण्याची शक्यता अधिक असते, असे नवीन संशोधनात  आढळले आहे.

Child and mobile phones : मानसिक आरोग्य समस्यांचा धोका दुप्पट

जी किशोरवयीन मुले दररोज किमान तीन तास सोशल मीडियावर घालवतात त्यांना नैराश्य आणि चिंता या लक्षणांसह मानसिक आरोग्य समस्यांचा धोका दुप्पट असतो, असेही नवीन संशाेधनात निदर्शनास आले आहे. १३ वर्षांखालील मुलांना तांत्रिकदृष्ट्या TikTok आणि Snapchat सारख्या सोशल मीडिया साइट्सवर खात्यांसाठी साइन अप करण्याची परवानगी नसली तरी, या निर्बंधांना तोडणे सोपे आहे. त्‍यामुळे १३ ते १७ वयोगटातील सुमारे ९५ टक्‍के मुले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात. याचा त्‍याच्‍या आरोग्‍यावर गंभीर परिणाम होत आहे. किशोरवयीन मुलांच्या झोपेवर नकारात्मक परिणाम होत असल्‍याचेही निदर्शनास आले.

१० ते १३ वयोगटातील मुलांना द्यावे मोबाईल फोन वापराचे याेग्‍य प्रशिक्षक

नवीन संशोधनातील निष्‍कर्षानुसार, १० ते १३ वयोगटातील मुलांना मोबाईल फोन हाताळण्‍यास द्यावा, मात्र त्यापूर्वी त्‍यांना योग्‍य प्रशिक्षण
द्यावे. या वयोगटातील मुलांनी इंटरनेट किंवा  ॲप्‍सचा वापर न करता मोबाईल फोनच्‍या माध्‍यमातून होणार्‍या संवादाची माहिती  द्यावी. त्‍यामुळे मुलांनी फोन वापरणे ही सहज प्रक्रिया बनते, असाही निष्‍कर्ष नवीन संशोधनात नोंदविण्‍यात आला आहे.

मोबाईल फोनचे धोकेही जाणून घेणे आवश्‍यक

किशोरवयीन मुलांमधील मेंदू विकसित होत असतो. त्‍यामुळे पालकांनी मोबाईल फोनचे धोके जाणून घेणे आवश्‍यक आहे. मोबाईल फोनचा वापर कसा करावा, याविषयी मुलांशी संवाद साधणे आणि त्यांना योग प्रशिक्षण देणे ही पालकांची जबाबदारी आहे. मोबाईल फोनचा मेंदूवर कसा परिणाम होतो, याबद्दल आपण स्वतः सह आपल्या मुलांना शिक्षित करणे आवश्यक आहे. पालकच मुलांना आधुनिक जगासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी शिक्षित आणि मार्गदर्शन करु शकतात. त्यांना स्मार्टफोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर आणि संवाद कसा साधावा, हे शिकवावे, अशी अपेक्षा न्यूरोसायंटिस्ट डॉ. कॅरोलिन लीफ यांनी व्‍यक्‍त केली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button